पाय घसरून विहिरीत पडल्याने ३१ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू.
अमळनेर/आबिद शेख

कळमसरे येथील ३१ वर्षीय तरुण शेतकरी दीपक दत्तूसिंग राजपूत यांचा शेतातील विहिरीत पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास गावाबाहेरील गणपती मंदिर परिसरातील विहिरीवर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक राजपूत हे स्वतःच्या शेतात औषध फवारणीसाठी पंपात पाणी भरण्याच्या उद्देशाने बैलगाडीसह शेतात गेले होते. गणपती मंदिराजवळील विहिरीवर त्यांनी काही बादल्या पाणी काढल्यानंतर शेवटची बादली काढत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि तोल जाऊन ते विहिरीत पडले.
घटनेची माहिती मंदिराशेजारील किशोर हरी मालचे यांना मिळताच त्यांनी तातडीने नातेवाईकांना कळविले. ग्रामस्थांच्या मदतीने दीपक यांना विहिरीतून बाहेर काढून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
घटनेनंतर पोलीस पाटील व सरपंच यांनी पंचनामा करून मारवड पोलीस ठाण्याला माहिती दिली. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दीपक राजपूत यांच्या पश्चात आई, एक भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार असून, कुटुंबातील कर्ता मुलगा गमावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक साजित मन्सुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय पाटील पुढील तपास करीत आहेत.
