पोलीस कोठडीतील मृत्यूंच्या तपासासाठी राज्य सरकारचे कडक नियम; सीआयडीकडून होणार स्वतंत्र चौकशी.
24 प्राईम न्यूज 29 Jul 2026

पोलीस कोठडीतील मृत्यूंच्या घटनांमध्ये पारदर्शकता वाढविणे, निष्पक्ष चौकशी सुनिश्चित करणे आणि अशा घटनांना प्रतिबंध घालणे या उद्देशाने राज्य सरकारने नवीन आणि सविस्तर मार्गदर्शक नियमावली लागू केली आहे. गृह विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी करत तपास प्रक्रिया, सीसीटीव्ही पुरावे, वैद्यकीय तपासणी आणि फॉरेन्सिक पुरावे संकलनाबाबत कठोर नियम निश्चित केले आहेत.

नवीन नियमांनुसार, मुंबईतील पोलीस कोठडीतील मृत्यूंची चौकशी गुन्हे शाखेकडून, तर राज्यातील इतर भागांतील प्रकरणांचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) करणार आहे. घटना घडल्यानंतर तात्काळ घटनास्थळ सुरक्षित ठेवणे, आकस्मिक मृत्यूची नोंद करणे आणि संबंधित सीसीटीव्ही फुटेज जतन करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
याशिवाय, अशा प्रत्येक घटनेची माहिती २४ तासांच्या आत जिल्हाधिकारी, राज्य मानवी हक्क आयोग आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक राहणार आहे.
शवविच्छेदन प्रक्रियेतही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, किमान तीन तज्ज्ञ डॉक्टरांच्या पॅनेलकडून शवविच्छेदन करणे तसेच संपूर्ण प्रक्रियेचे ऑडिओ-व्हिडिओ चित्रीकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मृतदेहातील जैविक व रासायनिक नमुने जतन करून त्यांची फॉरेन्सिक तपासणी करण्याच्या सूचनाही शासनाने दिल्या आहेत.
या नव्या नियमावलीमुळे पोलीस कोठडीतील मृत्यूंच्या तपासात अधिक पारदर्शकता, जबाबदारी आणि विश्वासार्हता निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
