शेतकऱ्यांच्या दिवसा वीजपुरवठ्यासाठी अमळनेरमध्ये मोठी वीज सुधारणा मोहीम आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; ६ उपकेंद्रांवर अतिरिक्त रोहित्र, शिरूडला नवीन ३३ केव्ही उपकेंद्र.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा पूर्ण क्षमतेने आणि सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी वीज वितरण यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ११ सप्टेंबर रोजी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तालुक्यातील वीज समस्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.


बैठकीला महावितरणचे कार्यकारी अभियंता निलेश सोनगिरे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर अंबाडकर, उपकार्यकारी अभियंता मनोज भावसार, सहाय्यक अभियंता अविनाश सूर्यवंशी यांच्यासह चैतन्य वाघ, विनायक बोरसे आणि अमित चव्हाण उपस्थित होते.
अमळनेर तालुक्यात सध्या १४ ठिकाणी ३३ केव्ही उपकेंद्रे कार्यरत आहेत. कृषी क्षेत्रातील वाढता वीजभार आणि भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता या यंत्रणेची क्षमता वाढविण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.
६ उपकेंद्रांवर अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर
वीज वितरण व्यवस्था बळकट करण्यासाठी वावडे, अंतुर्ली, जानवे, कळमसरे, सरबेटे आणि भरवस या सहा ३३ केव्ही उपकेंद्रांवर अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आले आहेत. या कामांना वेग देण्यात आला असून नोव्हेंबर २०२६ अखेरपर्यंत कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यामुळे उपकेंद्रांवरील अतिरिक्त भार कमी होऊन वीजपुरवठ्याची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.


चार कृषी वाहिन्यांवरील भार कमी करण्यासाठी उपाय
जानवे, सरबेटे, कळमसरे आणि गांधली उपकेंद्रांतून निघणाऱ्या कृषी वाहिन्यांवर सध्या मोठा भार आहे. त्यामुळे दिवसा कृषी पंपांना पूर्ण क्षमतेने वीज देताना अडचणी निर्माण होत आहेत. ही समस्या दूर करण्यासाठी संबंधित उपकेंद्रांपैकी तीन ठिकाणी प्रत्येकी ५ एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरू आहे.
शिरूड येथे नवीन ३३ केव्ही उपकेंद्र
तालुक्यातील वीज वितरण अधिक सक्षम करण्यासाठी शिरूड येथे नवीन ३३ केव्ही उपकेंद्राला मंजुरी देण्यात आली असून काम प्रगतीपथावर आहे. हे उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर परिसरातील वीजभाराचे विभाजन होऊन पुरवठ्याची विश्वासार्हता वाढण्यास मदत होणार आहे.
तात्पुरत्या उपायांऐवजी कायमस्वरूपी तोडगा
शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीजपुरवठा मिळावा यासाठी केवळ तात्पुरत्या उपायांवर अवलंबून न राहता उपकेंद्रांची क्षमता वाढविणे, अतिरिक्त रोहित्र बसविणे, नवीन उपकेंद्र उभारणे आणि विद्यमान वीज यंत्रणेचे बळकटीकरण करण्यावर भर देण्यात आला.
सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना आमदार अनिल पाटील यांनी संबंधित अधिकारी व अभियंत्यांना दिल्या. नोव्हेंबर २०२६ अखेर प्रस्तावित कामे पूर्ण झाल्यानंतर तालुक्यातील कृषी पंपांना दिवसा अधिक सक्षम आणि सुरळीत वीजपुरवठा मिळण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed