‘८०च्या दशकाचा’ ट्रेंड ठरू शकतो सायबर सापळा! फोटोच्या नादात चेहरा, डेटा आणि गोपनीय माहिती देऊ नका; सायबर पोलिसांचा सावधानतेचा इशारा.

0

अमळनेर/आबिद शेख 

इन्स्टाग्राम, फेसबुकसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या ‘८०चे दशक’ किंवा ‘८०चा ट्रेंड’ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जुन्या काळातील कपडे, हेअरस्टाइल आणि लूकमध्ये फोटो काढणे तसेच एआयच्या मदतीने ८०च्या दशकातील फोटो तयार करून ते सोशल मीडियावर शेअर करण्याची क्रेझ वाढली आहे. मात्र, या ट्रेंडच्या माध्यमातून नकळतपणे आपली वैयक्तिक माहिती आणि चेहऱ्याचा डिजिटल डेटा सायबर गुन्हेगारांच्या हाती जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावध राहावे, असा इशारा सायबर पोलिसांनी दिला आहे.थर्ड पार्टी अॅप्सचा धोका.

व्हायरल ट्रेंडसाठी अनेकजण विविध थर्ड पार्टी अॅप्स, वेबसाइट्स किंवा एआय फिल्टर्सचा वापर करतात. फोटो एडिट करण्याच्या नावाखाली अशा अॅप्सना मोबाईलमधील फोटो, कॉन्टॅक्ट्स, लोकेशन किंवा इतर परवानग्या दिल्या जाऊ शकतात. या माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.चेहऱ्याच्या डेटाचाही होऊ शकतो गैरवापर
एआय फिल्टरमध्ये फोटो तयार करताना चेहऱ्याचे विविध कोन, हावभाव आणि प्रतिमा डिजिटल स्वरूपात वापरल्या जातात. हा डेटा चुकीच्या व्यक्तीच्या हाती गेल्यास डीपफेक फोटो-व्हिडीओ, बनावट प्रोफाइल किंवा खोटी डिजिटल ओळख तयार करण्यासाठी त्याचा गैरवापर होऊ शकतो.

लाईक्स-व्ह्यूजच्या नादात धोका ओढवू नका
सोशल मीडियावर एखादा ट्रेंड व्हायरल झाला की त्यामागे कोणताही विचार न करता अनेकजण आपले फोटो शेअर करतात. विशेषतः सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्समध्ये ट्रेंड फॉलो करण्याची स्पर्धा असते. मात्र, प्रत्येक व्हायरल ट्रेंड सुरक्षित असेलच असे नाही. त्यामुळे केवळ लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी स्वतःची गोपनीय माहिती धोक्यात घालू नये.
सायबर पोलिसांचा महत्त्वाचा सल्ला
सोशल मीडिया अकाउंट शक्यतो ‘पब्लिक’ऐवजी ‘प्रायव्हेट’ ठेवावे. अनोळखी अॅप्सना फोटो, कॉन्टॅक्ट्स, कॅमेरा किंवा लोकेशनचा अनावश्यक अॅक्सेस देऊ नये. एआय फोटो तयार करण्यापूर्वी संबंधित अॅपची विश्वासार्हता आणि प्रायव्हसी पॉलिसी तपासावी.
वैयक्तिक माहितीच्या आधारे आर्थिक फसवणुकीचाही धोका
सोशल मीडियावरून मिळालेल्या वैयक्तिक माहितीचा वापर करून सायबर भामटे एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करू शकतात. त्यातून सोशल मीडिया अकाउंट हॅक करणे, बनावट ओळख तयार करणे किंवा बँक खात्याशी संबंधित फसवणुकीचे प्रयत्न होऊ शकतात. त्यामुळे ‘ट्रेंड आहे म्हणून फोटो शेअर करा’ यापेक्षा ‘सुरक्षितता महत्त्वाची’ हा दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed