अमळनेर पोलिसांची वाळू माफियांवर धडक कारवाई; ६ ट्रॅक्टर जप्त, चालकांविरुद्ध गुन्हा दाखल.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : अमळनेर पोलीसांनी अवैध गौणखनिज (वाळू) चोरी व वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत सहा ट्रॅक्टर ताब्यात घेतले असून सहा चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच या वाहनांच्या मूळ मालकांचा शोधही पोलीसांकडून सुरू आहे.


जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनायकराव कोते यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौणखनिज चोरी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचनांनुसार ही मोहीम राबविण्यात आली.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने मंगळवारी (दि. २८ जुलै) पहाटे १ ते ५ या वेळेत अमळनेर पोलीस ठाणे हद्दीत विशेष गस्त घातली. यावेळी हिंगोणे गावाजवळील बोरी नदीपात्रात विनापरवाना विना पास अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे पाच विना नंबरचे ट्रॅक्टर-ट्रॉली आणि एमएच-१९ सीजे-०७७५ क्रमांकाचा एक ट्रॅक्टर-ट्रॉली असा एकूण सहा ट्रॅक्टर आढळून आले.
या कारवाईदरम्यान योगेश नामदेव भोई (रा. रुबजीनगर, अमळनेर), प्रवीण सुधाकर सोनवणे (रा. हिंगोणे खुर्द), राहुल छोटू ठाकरे (रा. रुबजीनगर, अमळनेर), अर्जुन अशोक मालचे (रा. हिंगोणे खुर्द), सतीश मोहन बावीस्कर (रा. हिंगोणे खुर्द) आणि सोमनाथ मधुकर मोरे (रा. रुबजीनगर, अमळनेर) या चालकांना ताब्यात घेण्यात आले.
जप्त करण्यात आलेले सर्व ट्रॅक्टर अमळनेर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून चालकांविरुद्ध संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेण्याचे कामही पोलीसांकडून सुरू आहे.
यापुढे अमळनेर तालुक्यात अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed