सलग दुसऱ्यांदा ‘संसद रत्न’चा मान; खासदार स्मिता वाघ यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल.
24 प्राईम न्यूज 10 Sep 2026

जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांना प्रतिष्ठेचा ‘संसद रत्न पुरस्कार २०२६’ सलग दुसऱ्यांदा प्रदान करण्यात आला. संसदेतील प्रभावी सहभाग, जनतेच्या विविध प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणे तसेच मतदारसंघाच्या विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा राष्ट्रीय सन्मान देण्यात आला आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर खासदार स्मिता वाघ यांनी हा सन्मान आपल्यापुरता मर्यादित नसून जळगावच्या जनतेने दाखविलेल्या विश्वासाचा गौरव असल्याची भावना व्यक्त केली. संसदेत मांडलेले प्रश्न, विकासकामांसाठी केलेले प्रयत्न आणि विविध विषयांवरील पाठपुरावा यामागे मतदारसंघातील नागरिकांच्या अपेक्षा व समस्या हाच केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी सांगितले.
“गेल्या वर्षी मिळालेल्या पहिल्या ‘संसद रत्न’ पुरस्कारामुळे अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली. सलग दुसऱ्यांदा मिळालेला हा सन्मान माझी जनतेप्रती असलेली जबाबदारी आणखी वाढविणारा आहे,” असे खासदार स्मिता वाघ यांनी नमूद केले.

या सन्मानाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे मार्गदर्शन आणि विश्वासाबद्दल आभार मानले. तसेच संसद रत्न पुरस्कार समिती, ज्युरी सदस्य, संसदीय सहकारी, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते, सहकारी आणि शुभेच्छुकांचेही त्यांनी आभार व्यक्त केले.
दरम्यान, ‘संसद रत्न पुरस्कार २०२६’ मिळविणाऱ्या सर्व खासदारांचे अभिनंदन करताना जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याची प्रेरणा या पुरस्कारातून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

