अमळनेरच्या विकासाला नवी ‘हवाई’ झेप; गांधली रस्त्यावर कायमस्वरूपी हेलिपॅड सज्ज ४८.७२ लाखांच्या प्रशासकीय मान्यतेनंतर ५ एकर जागेत उभारणी; आपत्कालीन सेवा, उद्योग-व्यवसाय व व्हीआयपी दळणवळणाला मोठी मदत.

0

अमळनेर । आबिद शेख 

 

अमळनेर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची सुविधा आता प्रत्यक्षात आली असून, गांधली रस्त्यावर सुमारे ५ एकर जागेत कायमस्वरूपी हेलिपॅड उभारण्यात आले आहे. आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नातून या प्रकल्पाला शासनाची ४८.७२ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यामुळे अमळनेरच्या दळणवळण सुविधांमध्ये आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे.

अमळनेर हे व्यापार, उद्योग, राजकारण आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. शहरात मोठे उद्योग कार्यरत असून, व्यापारी, उद्योजक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची नियमित ये-जा असते. याशिवाय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांसह विविध राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांवेळी यापूर्वी तात्पुरत्या स्वरूपात हेलिपॅड तयार करावे लागत होते. यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून देणे आणि प्रत्येक वेळी होणारा खर्च ही मोठी अडचण होती.


ही अडचण कायमस्वरूपी दूर करण्याच्या उद्देशाने गांधली रस्त्यावरील ५ एकर जागा सार्वजनिक बांधकाम विभागासाठी उपलब्ध करून देण्यात आली. हेलिकॉप्टरच्या सुरक्षित लँडिंगसाठी परिसरात झाडे, विद्युत तारा, इमारती किंवा इतर अडथळे राहणार नाहीत, याचीही काळजी घेण्यात आली असून काँक्रीट हेलिपॅडची उभारणी पूर्ण करण्यात आली आहे.
आपत्कालीन सेवांसाठी ठरणार वरदान


एखाद्या गंभीर रुग्णाला तातडीने मुंबई, दिल्ली किंवा अन्य शहरात उपचारासाठी हलविण्याची गरज भासल्यास या हेलिपॅडचा मोठा उपयोग होऊ शकतो. तसेच आपत्तीच्या काळात मदत व बचावकार्य, व्हीआयपींचे आगमन, प्रशासकीय दौरे आणि इतर आपत्कालीन सेवांसाठीही ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.
नुकतेच एका शहीद जवानाचे पार्थिव आणण्यासाठी या हेलिपॅडची यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
उद्योग, पर्यटन आणि व्यापाराला मिळणार चालना
अमळनेरमध्ये उद्योग आणि व्यवसायाचा विस्तार होत असताना कायमस्वरूपी हेलिपॅडमुळे उद्योजक, व्यापारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांसाठी दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. भविष्यात पर्यटन, उद्योग, व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठीही ही सुविधा महत्त्वाची ठरणार असल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले.
वाढत्या गरजा लक्षात घेऊन भविष्यात या हेलिपॅडचा आवश्यकतेनुसार विस्तार करण्याचे नियोजनही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed