महापुरात उद्ध्वस्त झालेल्या फोटोग्राफरच्या मदतीला ‘हेल्पिंग हँड’; ३० हजारांचा धनादेश देत बांधवांनी दिली आपुलकीची साथ.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : ३१ जुलै रोजी अमळनेर शहराला आलेल्या महापुरामुळे अनेक व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. गळवाडे रोडवरील मुंदडा रेसिडेन्सीच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधील फोटोग्राफर प्रेम पाटील यांच्या स्टुडिओमध्ये पुराचे पाणी शिरल्याने कॅमेरे, उपकरणे व इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर फोटोग्राफर बांधवांनी त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.


‘एआय पी एच एच ऑल इंडिया फोटोग्राफर हेल्पिंग हँड फाऊंडेशन’चे महाराष्ट्र सचिव पवन बन्सल यांनी सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून प्रेम पाटील यांच्याशी संपर्क साधत नुकसानीची माहिती घेतली. विशेष म्हणजे प्रेम पाटील हे संस्थेचे सदस्य नसतानाही केवळ फोटोग्राफर बांधव असल्याच्या भावनेतून संस्थेने मदतीचा निर्णय घेतला.


त्यानुसार संस्थापक व अध्यक्ष धरम सरोज, उपाध्यक्ष अशोक कोटियन, महाराष्ट्र खजिनदार नितीन पाटील, महाराष्ट्र सचिव पवन बन्सल आणि दिलीप सोनार यांनी ९ सप्टेंबर रोजी अमळनेर येथे प्रत्यक्ष भेट देऊन प्रेम पाटील यांना ३० हजार रुपयांचा मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
यावेळी संस्थापक व अध्यक्ष धरम सरोज यांनी उपस्थित फोटोग्राफर बांधवांना मार्गदर्शन केले. स्टुडिओमध्ये महत्त्वाची उपकरणे तसेच ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात डेटा असतो. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या काळात उपकरणे आणि डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
फोटोग्राफी व्यवसायात स्पर्धेपेक्षा परस्पर सहकार्याची भावना अधिक महत्त्वाची आहे. सहकाऱ्याला प्रतिस्पर्धी न मानता मित्र समजून त्याच्या अडचणीच्या काळात मदतीला धावून जाणे हीच खरी संघटित ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. ‘संकटात मदत हीच खरी एकजूट’ असा संदेशही त्यांनी दिला.
अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी असोसिएशनच्या माध्यमातून फोटोग्राफर बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. फोटोग्राफर बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच गरजेच्या वेळी परस्पर सहकार्य करण्यासाठी असोसिएशन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष भगवान पाटील, खजिनदार मनोज चित्ते, अनंत पाटील, नितीन भावसार, गौरव शुक्ल, वरुण पाटील, प्रणव महाजन, राहुल भोई, विपुल पाटील, कुणाल पाटील यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य आणि तालुक्यातील मोठ्या संख्येने फोटोग्राफर बांधव उपस्थित होते.
महापुरात सर्वस्वाचे नुकसान झालेल्या सहकाऱ्याच्या मदतीसाठी फोटोग्राफर बांधवांनी एकत्र येत ‘संकटाच्या काळात माणूस म्हणून माणसाच्या पाठीशी उभे राहणे’ हा सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed