AI तंत्रज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरज; आ अनिल पाटील.-प्रताप महाविद्यालयात AI प्रशिक्षणार्थी विद्यार्थी व आदर्श शेतकऱ्यांचा गौरव
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : AISECT-HAL कौशल्य रथ आणि प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘AI तंत्रज्ञान विद्यार्थी बक्षीस समारंभ’ तसेच ‘स्वर्गीय अजितदादा पवार कृषी सन्मान पुरस्कार सोहळा’ उत्साहात पार पडला. पूज्य साने गुरुजी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.शी. मंडळाचे कार्याध्यक्ष सी.ए. नीरज अग्रवाल होते.

कार्यक्रमाची सुरुवात दानशूर प्रताप शेठजी, सरस्वती देवी, पूज्य साने गुरुजी आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली. यावेळी आमदार अनिल पाटील, AISECT विद्यापीठाचे समन्वयक बिनेश वर्मा, सी.ए. नीरज अग्रवाल, धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते श्यामकांत सनेर, खा.शी. मंडळाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, उपाध्यक्ष कमल कोचर, ज्येष्ठ संचालक हरी वाणी, प्रदीप अग्रवाल तसेच विश्वस्त वसुंधरा लांडगे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक HAL कौशल्य रथचे समन्वयक महेंद्र शिरसाठ यांनी केले. त्यांनी AI प्रशिक्षण उपक्रमाचा उद्देश, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संधी आणि कौशल्य विकासाचे महत्त्व विशद केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
AISECT विद्यापीठाचे समन्वयक बिनेश वर्मा यांनी विद्यार्थ्यांना AI चा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन करताना बँकिंग माहिती, पासवर्ड यांसारखी गोपनीय माहिती कोणत्याही AI प्लॅटफॉर्मवर शेअर करू नये, असा सल्ला दिला. AI च्या माध्यमातून इंटर्नशिप, प्रोजेक्ट आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार अनिल पाटील यांनी AI हे भविष्यातील प्रभावी तंत्रज्ञान असून त्याचा वापर शिकणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. प्रशासन, शिक्षण, उद्योग आणि शेती या सर्व क्षेत्रांमध्ये AI मुळे मोठे बदल घडत असून विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. विशेषतः शेतकऱ्यांच्या मुलांनी AI च्या साहाय्याने आधुनिक आणि उत्पादक शेतीकडे वाटचाल करावी, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पाच शेतकऱ्यांना स्वर्गीय अजितदादा पवार आदर्श कृषी सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रताप महाविद्यालयातील AI प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाही पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी HAL कौशल्य रथच्या प्रशिक्षिका परिणिता पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले, तर दीपक चौधरी यांनी तांत्रिक सहकार्य केले. यावेळी प्राचार्य, प्राध्यापक, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाल्मिक जाधव यांनी केले, तर प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
