लाठीचार्ज प्रकरणावरून अमळनेरात राजकीय खळबळ; श्याम पाटील यांनी सोडली भाजपची साथ.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : अमळनेर नगरपरिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती श्याम जयवंतराव पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदांचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जळगाव (पश्चिम) जिल्हाध्यक्ष राधेश्यामजी चौधरी यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सादर केला असून, दिल्लीतील जंतर-मंतर आणि संसद भवन परिसरात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ हा निर्णय घेतल्याचे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे.

श्याम पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सत्तेचा उपयोग करून तालुका पातळीवर विधायक व सामाजिक हिताची कामे करण्याच्या सकारात्मक उद्देशाने ते पक्षात कार्यरत होते. मात्र, लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार असताना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आल्याने आपण अत्यंत व्यथित झालो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
देशाच्या भवितव्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तरुणांचा आवाज ऐकून घेण्याऐवजी त्यांच्यावर शक्तीचा वापर करण्यात आला, ही बाब आपल्या अंतःकरणाला अस्वस्थ करणारी असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. लोकशाहीत मतभेदांचे निराकरण संवादातून आणि संवेदनशीलतेने व्हावे, अशी आपली भूमिका असून आंदोलन दडपण्यासाठी हिंसेचा मार्ग स्वीकारणे लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांशी सुसंगत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या घडामोडींमुळे आपल्या वैचारिक भूमिका आणि पक्षाच्या सध्याच्या भूमिकेमध्ये मूलभूत मतभेद निर्माण झाल्याचे सांगत, वैचारिक प्रामाणिकता आणि सामाजिक भूमिकेला प्राधान्य देत भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदांचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे श्याम पाटील यांनी आपल्या पत्राद्वारे जाहीर केले आहे.
श्याम पाटील यांच्या या निर्णयामुळे अमळनेरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, त्यांच्या राजीनाम्यानंतर स्थानिक राजकारणात पुढील घडामोडींंकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
