शेतरस्ते आता नकाशावर व सातबाऱ्यावर दिसणार; राज्यात शेतरस्त्यांसाठी ₹२७०० कोटींची तरतूद – आमदार अनिल पाटील.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : राज्यातील शेतकऱ्यांसमोरील सर्वात गंभीर प्रश्न असलेल्या शेतरस्त्यांच्या समस्येवर शासनाने मोठे पाऊल उचलले असून, शेतरस्त्यांचे मॅपिंग करून त्यांची सातबाऱ्यावर नोंद करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात प्रत्येक शेतरस्ता अधिकृत नकाशावर दिसेल. यासाठी मुख्यमंत्री यांनी विशेष समिती गठित केली असून त्यामध्ये आपला समावेश करण्यात आला आहे. तसेच शेतरस्त्यांच्या विकासासाठी शासनाने ₹२७०० कोटींची तरतूद केली असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी दिली.
महसूल विभागाच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. इंदिरा भवन येथे २५ जुलै रोजी आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. विविध शासकीय विभागांचे तब्बल ५६ स्टॉल उभारण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. अजित पवार यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार अनिल पाटील यांनी महसूल समाधान शिबिरामुळे नागरिकांच्या विविध समस्या तात्काळ आणि जागेवर सोडविण्यास मदत होत असल्याचे सांगितले. तसेच संपूर्ण अमळनेर तालुक्याचा पोखरा योजनेत समावेश करण्याची मागणीही त्यांनी केली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. एल-निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी पाण्याची बचत करावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच शासनाकडून मोफत वैरण बियाणे वितरित केले जात असून त्याची लागवड करून पशुधनासाठी चारा साठवून ठेवावा, असेही त्यांनी सांगितले.
माजी आमदार तथा कृषिभूषण साहेबराव पाटील यांनीही शासनाच्या विविध योजनांची माहिती देत लाभार्थ्यांनी नियमांची पूर्तता करून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील, उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे, डीवायएसपी विनायक कोते, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पारोळा तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, नायब तहसीलदार सी. यू. पाटील, अजय कुलकर्णी, प्रशांत धमके, पुरवठा अधिकारी रुक्साना शेख, अमोल पाटील, गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, भागवत पाटील, विक्रांत पाटील, अनिल शिसोदे, सचिन पाटील, गणेश भामरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शिबिरात महसूल विभागामार्फत शेतरस्त्यांच्या नोंदीचे सातबारा उतारे, कुंभार समाजातील व्यावसायिकांना डिजिटल ओळखपत्रे, अंगणवाडी सेविकांना गॅस जोडणी, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्य, वनविभागामार्फत वन्यप्राणी नुकसानभरपाईचे धनादेश, पंचायत समितीमार्फत घरकुल योजनेचे लाभ, शेती साहित्य, नगरपरिषदेकडून घरकुल योजना व बांधकाम परवानगीपत्रे, बचतगटांना धनादेश, पशुसंवर्धन विभागामार्फत शेळी, गाय-म्हैस वाटप, वैरण बियाणे, महिला व बालकल्याण विभागाकडून मातृवंदन योजना व बेबी केअर किट, महावितरणकडून अंगणवाड्यांना वीज जोडणी व सोलर पंप अशा विविध योजनांचा लाभ देण्यात आला.
या शिबिरात २,४९६ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभवितरण करण्यात आले असून, एकूण २० हजार ९२९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांनी केले. सूत्रसंचालन संजय पाटील आणि वसुंधरा लांडगे यांनी केले, तर आभार डॉ. उल्हास देवरे यांनी मानले.
