चैतन्य संदानशिव हल्ला प्रकरण : मुख्य आरोपीच्या तात्काळ अटकेसाठी अमळनेरात मोर्चा; प्रशासनाला निवेदन.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : देवगाव-देवळी येथील स्टोन क्रशरवर काम करणारे चैतन्य राजेंद्र संदानशिव यांच्यावर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी अमळनेर शहरात समाजबांधवांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. माजी नगरसेवक नरेंद्र रामभाऊ संदानशिव यांच्या नेतृत्वाखाली महाराणा प्रताप चौकातून प्रांत कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुख्य आरोपी अनंत निकम याच्यासह सर्व संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली.

मोर्चादरम्यान मोठ्या संख्येने समाजबांधव तसेच विविध समाजातील नागरिक सहभागी झाले होते. “पीडिताला न्याय मिळालाच पाहिजे”, “दोषींना तात्काळ अटक करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. त्यानंतर प्रांताधिकारी तसेच अमळनेर पोलिस निरीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, चैतन्य संदानशिव हा स्टोन क्रशरवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा सर्वसामान्य युवक असून त्याच्यावर जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर तीक्ष्ण हत्याराने पोटावर वार करून गंभीर जखमी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्याला बेदम मारहाण करण्यात आली असून त्याचा मित्र कल्पेश पाटील यालाही मारहाण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या घटनेमुळे समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष, जलद व सखोल तपास करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमातील लागू असलेल्या सर्व कलमान्वये आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पीडित व साक्षीदारांना आवश्यक सुरक्षा, तसेच कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
मोर्चात माजी नगरसेवक नरेंद्र रामभाऊ संदानशिव, नगरसेवक डॉ. डिंगबर महाले, नगरसेविका शोभाबाई गढरे, देवदत्त संदानशिव, अरुण घोलप, पंचशीला संदानशिव, कल्पना मोरे, दाजीबा गव्हाणे, सनी गायकवाड, तुषार संदानशिव, अरविंद संदानशिव, आकाश संदानशिव, योगेश बिऱ्हाडे, समाधान मैराळे, सुरेश कांबळे, अनिल ठाकूर, रुहदयनाथ मोरे, राहुल संदानशिव, संदीप गढरे, महेश संदानशिव, प्रमोद बिऱ्हाडे, जयेश पगारे, विवेक सांगोरे, संदीप वाघ, सचिन ढिवरे, शुभम घोलप, मनीष पाटील, करण साळुंखे, उमेश ढिवरे, संतोष साळवे, गोपीचंद चव्हाण, प्रल्हाद मोरे, सुनील संदानशिव, राजेंद्र संदानशिव, सुधाकर सोनवणे, संजय बिऱ्हाडे, राजेंद्र गायकवाड, आकाश गढरे, रमेश झाल्टे यांच्यासह असंख्य समाजबांधव व विविध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा दबाव न स्वीकारता दोषींवर कठोर व निष्पक्ष कारवाई करावी आणि पीडिताला न्याय मिळवून द्यावा, अशी एकमुखी मागणी मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाकडे केली.
