बँक कर्मचाऱ्यांना ‘लोकसेवक’ दर्जा नाही; कलम 353 लागू होणार नाही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय.
अमळनेर/ आबिद शेख

न्यायमूर्ती मेहरोज खान पठाण यांनी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. भादंवि कलम 353 अंतर्गत गुन्हा सिद्ध करण्यासाठी सर्वप्रथम ज्या व्यक्तीवर हल्ला झाला किंवा जिच्या शासकीय कामात अडथळा आणण्यात आला, ती व्यक्ती भादंवि कलम 21 नुसार ‘लोकसेवक’ असणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा दाखला देत उच्च न्यायालयाने बँक कर्मचाऱ्यांना भादंवि कलम 21 अंतर्गत सर्वसाधारणपणे लोकसेवक मानता येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे बँक कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणला म्हणून कलम 353 लावण्यासाठी आवश्यक असलेली मूलभूत अट पूर्ण होत नसल्यास, त्या कलमांतर्गत कारवाई टिकू शकत नाही.

या निर्णयामुळे बँक कर्मचाऱ्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये भादंवि कलम 353 लावताना पोलिस आणि तपास यंत्रणांना संबंधित व्यक्तीचा कायदेशीर दर्जा तपासणे आवश्यक ठरणार आहे. न्यायालयाच्या या निरीक्षणामुळे बँक कर्मचारी आणि त्यांच्याशी संबंधित गुन्हेगारी प्रकरणांमध्ये कायद्याच्या अंमलबजावणीबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन मिळाले आहे.

