खेळातून संस्कार, श्रमातून आनंद; गलवाडेत साने गुरुजी प्रतिष्ठानचे शिबिर उत्साहात.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : “करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे” या भावनेतून साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने गलवाडे गावात श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सुमारे ५० मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
शिबिरादरम्यान मुलांना येत असलेले पारंपरिक खेळ व कौशल्ये मुलींना शिकविण्यात आली. झाडावर चढणे, उड्या मारणे, टायर खेळणे, गोट्या खेळणे यांसारख्या खेळांमध्ये मुला-मुलींनी एकत्र सहभाग घेतला. त्याचबरोबर गाणी, गप्पा आणि गोष्टींच्या माध्यमातून मुलांनी आनंद लुटत एकमेकांशी मैत्रीचे नातेही घट्ट केले.

श्रमसंस्कारानंतर थकलेल्या मुलांसाठी चुलीवर तयार केलेली स्वादिष्ट खिचडी तसेच पौष्टिक शिरा देण्यात आला. ग्रामीण वातावरणात पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या या भोजनाचा मुलांनी मनसोक्त आनंद घेतला.

शिबिर यशस्वी करण्यासाठी गलवाडे गावातील आम्रपाली ताई, भारती ताई आणि मंगला ताई यांनी विशेष सहकार्य केले. गोपाल बडगुजर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या दर्शना पवार, अजय भाऊ आणि डॉ. अतुल चौधरी यांनी संपूर्ण शिबिरात मुलांसोबत सहभागी होत शिकणे आणि शिकवणे या दोन्ही भूमिका उत्स्फूर्तपणे पार पाडल्या.


या उपक्रमातून मुलांमध्ये परस्पर सहकार्य, समानता, मैत्री, श्रमाची प्रतिष्ठा आणि पारंपरिक खेळांची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिबिराच्या आयोजनाबद्दल गलवाडे गावातील ग्रामस्थांनी साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed