उधवडा-उंबरगाव पुलावर पाणी धोक्याच्या पातळीवर; रेल्वे वाहतूक ठप्प, अमळनेर लायन्स क्लबकडून प्रवाशांना खिचडीचे वाटप.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : सुरत–मुंबई रेल्वे मार्गावरील उधवडा–उंबरगाव दरम्यान पुलावर पाण्याची पातळी धोक्याच्या वर गेल्याने रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील रेल्वे वाहतूक तात्पुरती निलंबित केली आहे. त्यामुळे अनेक गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.

या परिस्थितीमुळे गाडी क्रमांक २२९७२ पटणा–बांद्रा एक्सप्रेस अमळनेर रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली. पुढील मार्ग बंद असल्याने ही गाडी रात्रभर अमळनेर स्थानकावर उभी राहणार असून परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर अमळनेरवरून पुन्हा पटण्याच्या दिशेने रवाना करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
तसेच भुसावळ–दादर खान्देश एक्सप्रेस (गाडी क्रमांक १९००४) ही गाडी नंदुरबार रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली आहे. रेल्वे मार्गावरील परिस्थितीवर प्रशासन सातत्याने लक्ष ठेवून असून पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, अमळनेर रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी अमळनेर लायन्स क्लब पुढे सरसावला आहे. क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांनी स्थानकावर येऊन सुमारे १,००० ते १,२०० प्रवाशांना गरम खिचडीचे मोफत वाटप केले. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत अनेक प्रवाशांना अन्नाची अडचण निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन लायन्स क्लबने तत्काळ मदतकार्य सुरू केले.
प्रवाशांनी या सामाजिक उपक्रमाबद्दल लायन्स क्लबचे आभार मानले. प्रतिकूल परिस्थितीतही स्वयंसेवकांनी सेवा देत प्रवाशांना दिलासा दिला. रेल्वे प्रशासनानेही प्रवाशांना संयम राखण्याचे आवाहन केले असून पुढील घडामोडींनुसार रेल्वे वाहतुकीबाबत माहिती दिली जाईल, असे सांगितले.
