अमळनेर एसटी आगारात ५ अत्याधुनिक नवीन बसेस दाखल; आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : अमळनेर येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आगारात ५ अत्याधुनिक नवीन बसेस दाखल झाल्या असून त्यांचे पूजन व लोकार्पण माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या नवीन बसेसमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

अशोक लेलंड कंपनीच्या या बीएस-६ मॉडेलच्या बसेस ३ बाय २ आसन रचनेच्या असून प्रत्येक बसमध्ये ५२ आसने आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी मोबाईल चार्जिंग सुविधा, बसच्या आत व बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे, माईक, बॅक कॅमेरा तसेच एअर सस्पेन्शन यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
यावेळी आमदार अनिल पाटील यांनी सांगितले की, अमळनेर आगारासाठी आणखी ५ नवीन बसेस मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू असून यापूर्वीही त्यांच्या पाठपुराव्यामुळे ५ बसेस आगाराला प्राप्त झाल्या होत्या. नव्याने आलेल्या बसेसमुळे अमळनेर आगारातील एकूण बसेसची संख्या आता ७५ झाली आहे.
आमदारांनी केली बसची सफर
लोकार्पणानंतर आमदार अनिल पाटील यांनी अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्त्यांसह नवीन बसमधून प्रतीकात्मक प्रवास करत बसची पाहणी केली.
पंढरपूर यात्रेसाठी एसटीला प्रवाशांची पसंती
सध्या पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी आषाढी यात्रा सुरू असल्याने एसटी बससेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दररोज ३ ते ४ बसेस पंढरपूरकडे धावत असून ग्रामीण भागातील ४० ते ४२ प्रवाशांचा गट तयार झाल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र बसची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. या बसेसमध्ये शासनाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी सवलती लागू आहेत. तसेच पंढरपूर यात्रेसाठी अमळनेर आगारातून १२ बसेस इतर आगारांना देण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक राकेश शिवदे यांनी दिली.
लोकार्पण सोहळ्यास कामगार नेते एल. टी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष चेतन राजपूत, शेतकी संघ संचालक विक्रांत पाटील, पत्रकार किरण पाटील, एस. टी. मोरे, गौरव पाटील, आगार व्यवस्थापक राकेश शिवदे, कार्यशाळा अधीक्षक प्रमोद बाविस्कर, वाहतूक निरीक्षक मुकेश सैदाने, वरिष्ठ लिपिक तुषार पाटील, अकाऊंटंट अमोल पाटील यांच्यासह एसटीचे अधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
