मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात वृक्षारोपणासह विविध सामाजिक उपक्रम.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त अमळनेर येथे अनुलोम परिवाराच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांद्वारे पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि भारतीय संस्कृतीचा संदेश देण्यात आला.

राज्यभर सुरू असलेल्या ‘देववृक्ष अभियान’ अंतर्गत ५६ हजार वृक्षारोपणाच्या संकल्पाला पाठिंबा देत अमळनेरमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन करण्याचा निर्धारही उपस्थितांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात टाळ-मृदंगाच्या पारंपरिक संकल्पनेवर आधारित आकर्षक व भव्य रांगोळी साकारण्यात आली. या रांगोळीने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. तसेच महिला मंडळाच्या वतीने ५६ दिवे प्रज्वलित करून मुख्यमंत्री यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा अर्पण करण्यात आल्या.
यावेळी बाल वारकरींनी अभंग, टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात आनंदोत्सव साजरा करत मुख्यमंत्री फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. उपस्थित महिलांनीही त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाचे आयोजन अनुलोम मित्र अभिषेक पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाग जनसेवक मनोहर सोनवणे, संवादिनी भाविका पाठक, संवादिनी संगीता पाटील, अनुलोम मित्र गणेश पाटील आणि अभिषेक भावसार यांनी विशेष सहकार्य केले.
