ग्रामपंचायतींच्या जनसुविधा योजनेच्या कामांच्या व्याप्तीत वाढ; सोलर, वाचनालय, क्रीडांगणासह पाच नव्या कामांचा समावेश.
24 प्राईम न्यूज 23 Jul 2026

राज्य शासनाने “ग्रामपंचायतीला जनसुविधांसाठी विशेष अनुदान” या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कामांच्या व्याप्तीत महत्त्वपूर्ण वाढ केली आहे. यासंदर्भात ग्रामविकास विभागाने २० जुलै २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला आहे.

नवीन शासन निर्णयानुसार जनसुविधा योजनेत पाच नव्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये गावांमध्ये सार्वजनिक दिवाबत्तीची व्यवस्था करणे (कमाल १५ लाख रुपये), शासकीय कार्यालयांवर सोलर प्रणाली बसविणे (२० लाख रुपये), वाचनालय इमारत बांधकाम (२० लाख रुपये), क्रीडांगण विकास (२० लाख रुपये) तसेच गावाच्या हद्दीतील शासकीय जागांचे सौंदर्यीकरण (१५ लाख रुपये) या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
शासनाने स्पष्ट केले आहे की, या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात येणारी कामे इतर कोणत्याही शासकीय योजनेतून प्रस्तावित अथवा मंजूर करण्यात येणार नाहीत. त्यामुळे निधीची पुनरावृत्ती टाळून ग्रामपंचायतींना आवश्यक जनसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, ऊर्जा बचत, क्रीडा, शिक्षण आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळणार असून ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी अधिक व्यापक संधी उपलब्ध होणार आहेत.
