सीसीआय कापूस खरेदीसाठी अमळनेर बाजार समितीत नोंदणी सुरू १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणीची मुदत; शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोंदणीसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांची मोफत नोंदणी करण्यात येणार आहे.

नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड, कापूस पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा, फार्मर आयडी, बँक पासबुक तसेच आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात, असे बाजार समिती प्रशासनाने कळविले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना घरबसल्या नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये ‘कपास किसान’ ॲप डाउनलोड करून त्याद्वारेही नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी निर्धारित मुदतीत नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सीसीआय केंद्राचे प्रमुख योगेश थाळनेरकर यांनी केले आहे.

बाजार समितीचे सभापती अशोक पाटील व सचिव डॉ. उन्मेष राठोड यांनीही तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे

