राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘जनसेवा सप्ताह’ प्रारंभ; अमळनेरात महापुरुषांना अभिवादन, शाखा उद्घाटन व सामाजिक उपक्रमांना सुरुवात.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर विधानसभाe मतदारसंघात २२ जुलैपासून ‘जनसेवा सप्ताह’ उपक्रमाला उत्साहात प्रारंभ करण्यात आला. या निमित्ताने स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण, महापुरुषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या शाखांचे उद्घाटन तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांचे निरीक्षक, माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वात या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
कृउबात महाराष्ट्रातील पहिल्या पुतळ्याचे पूजन

जनसेवा सप्ताहाची सुरुवात अमळनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात सकाळी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी आमदार अनिल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात उभारण्यात आलेल्या स्व. अजितदादा पवार यांच्या राज्यातील पहिल्या पुतळ्याचे लोकार्पण आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
संघटन विस्ताराला प्राधान्य देत शहरातील आर. के. नगर, पिंपळे रोड, ढेकू रोड, मिलचाळ, तांबेपुरा, गांधलीपुरा, कुंटे रोड, माळीवाडा, पैलाड आदी भागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखांचे उद्घाटन व फलकांचे अनावरण करण्यात आले. आगामी काळात अमळनेर शहरातील प्रत्येक प्रभाग तसेच तालुक्यातील प्रत्येक गावात पक्षाच्या शाखा सुरू करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज, पूज्य साने गुरुजी, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघात स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच शेतकरी सहकारी संघाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
२८ जुलैपर्यंत सुरू राहणाऱ्या ‘जनसेवा सप्ताह’ अंतर्गत रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, आरोग्यविषयक उपक्रम आणि इतर विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी, विविध फ्रंटल सेलचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, महिला पदाधिकारी, शेतकरी सहकारी संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी, संचालक, माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
