लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे सोन्याचे आमिष; महिलेला पळवून नेत अत्याचार, आरोपी अटकेत.

0

अमळनेर/आबिद शेख


अमळनेर: लाडकी बहीण योजनेत जमा झालेल्या पैशांतून सोन्याचे दागिने करून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेला पळवून नेल्याचा आणि तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार अमळनेर तालुक्यातील कलाली येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी कलाली येथील सुदाम भगवान भिल याच्याविरुद्ध बलात्कारासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पतीपासून विभक्त झाल्यानंतर आई-वडिलांसोबत कलाली येथे राहत होती. मार्च २०२६ पर्यंत तिच्या लाडकी बहीण योजनेत सुमारे ७० हजार रुपये जमा झाले होते. त्यावेळी गावातील दुर्गाबाई भिल आणि उषाबाई सुभाष भिल यांनी त्या पैशांतून सोन्याचे दागिने करून देण्याचे आमिष दाखवले.
त्यानंतर पीडित महिला, तिचा लहान मुलगा, दुर्गाबाई आणि उषाबाई अमळनेरकडे निघाल्या. मात्र मंगळ मंदिराजवळ आरोपी सुदाम भगवान भिल याने त्यांना गाडीत बसवले. सोनाराच्या दुकानात नेण्याऐवजी तो महिलेला थेट चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथे घेऊन गेला. तेथे गावाबाहेर झोपडी करून तिला मुलासह ठेवले.
महिलेने विरोध केल्यास तिला आणि तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. भीतीपोटी ती आरोपीसोबत राहत होती. या काळात आरोपीने तिच्यावर वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, १६ जून रोजी आरोपी बाहेर गेल्यानंतर महिला मुलाला घेऊन कमखेडा येथे बहिणीकडे पोहोचली. तेथे तिने संपूर्ण घटना सांगितल्यानंतर तिचा भाऊ आणि वडील यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर मारवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
तक्रारीवरून पोलिसांनी सुदाम भगवान भिल याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय साजिद मन्सुरी करीत आहेत.
दरम्यान, याच प्रकरणाशी संबंधित मारहाणीच्या घटनेत दुर्गाबाई भिल यांच्या फिर्यादीवरून सुदाम उर्फ उखु हिरालाल भिल याच्याविरुद्धही मारवड पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत तिघे जखमी झाले असून दुर्गाबाई यांच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याने त्यांच्यावर धुळे येथे उपचार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed