साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये राजभाषा हिंदी ऑलिम्पियाड परीक्षा उत्साहात संपन्न; १२० विद्यार्थिनींचा सहभाग.
अमळनेर /आबिद शेख

येथील साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था, पुणे यांच्या वतीने आयोजित राजभाषा हिंदी ऑलिम्पियाड परीक्षा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. परीक्षेत शाळेतील तब्बल १२० विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. कौस्तुभ पाटील उपस्थित होते. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करताना, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन शाळेचा नावलौकिक वाढवत असल्याचे सांगितले. तसेच हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी विद्यार्थिनींचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रमुख पाहुणे ॲड. कौस्तुभ पाटील यांनी विद्यार्थिनींना दररोज महान व्यक्तींच्या पुस्तकातील किमान १५ पाने वाचण्याचा आणि आठवड्यातून एक पुस्तक पूर्ण करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. दूरध्वनीद्वारे प्रताप महाविद्यालयाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. प्रा. कुमावत यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.
अध्यक्ष संदीप घोरपडे यांनी हिंदी भाषेचे महत्त्व आणि अशा स्पर्धा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यात होणारी वाढ याविषयी मार्गदर्शन केले.
परीक्षेसाठी हिंदी शिक्षक दिलीप पाटील यांनी मार्गदर्शन केले. ज्येष्ठ शिक्षक जे. एस. पाटील, आर. एम. देशमुख, मुकेश पाटील आणि दीपक महाजन यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुकेश पाटील यांनी मानले. संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील व संचालक मंडळानेही विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.
