श्री मंगळग्रह मंदिर प्रकरण : सोशल मीडिया पोस्टवरून अनंत निकमविरुद्ध पोलिसांसह प्रशासनाकडे सामूहिक तक्रारी डॉ. डिगंबर महाले यांची पोलिसांत फिर्याद; विविध संघटना, कर्मचारी व नागरिकांकडून कारवाईची मागणी, धर्मदाय विभागाकडेही तक्रार दाखल करण्याची तयारी.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : श्री मंगळग्रह मंदिरासंदर्भात सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह पोस्ट व व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर अमळनेर येथील अनंत रमेश निकम यांच्याविरुद्ध पोलिस व प्रशासनाकडे विविध स्तरांवर तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मंदिराचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून, सकल हिंदू समाज, विविध हिंदुत्ववादी संघटना, मंगळग्रह सेवा संस्थेचे कर्मचारी, परिसरातील व्यावसायिक तसेच व्हॉईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांनीही स्वतंत्र निवेदने देत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार, २९ जून रोजी अनंत निकम यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये श्री मंगळग्रह मंदिराच्या संदर्भातील न्यायालयीन प्रकरणाबाबत दिशाभूल करणारी माहिती देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित व्हिडिओमुळे मंदिराची व डॉ. डिगंबर महाले यांची प्रतिमा मलिन झाल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
डॉ. महाले यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सार्वजनिक न्यास कार्यालयातील बदल अहवाल (चेंज रिपोर्ट) प्रकरणात त्यांचा अर्ज पुराव्याचे प्रतिज्ञापत्र सादर न झाल्याने नामंजूर झाला होता. मात्र त्या आदेशाविरुद्ध अपील दाखल करण्यात आले असून, अंतिम निर्णय झालेला नसतानाही सोशल मीडियावर न्यायालयाच्या नावाने खोटे निष्कर्ष (Findings) प्रसिद्ध करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशात नसलेली निरीक्षणे स्वतःच्या कथनातून जोडून त्यांची व मंदिराची बदनामी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
फिर्यादीत असेही नमूद करण्यात आले आहे की, न्यायालयाने कधीही प्रसिद्ध न केलेली कथित प्रेसनोट तयार करून ती सोशल मीडियावर व प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आली. याबाबत धर्मदाय विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांनी अशा प्रकारचे कोणतेही प्रसिद्धिपत्रक जारी केले नसल्याचे स्पष्ट केल्याचा दावा डॉ. महाले यांनी केला आहे.
सोमवारी तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्याकडे विविध संघटनांनी स्वतंत्र निवेदने सादर केली. निवेदनांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्या जात असून, शहरातील सामाजिक सलोखा बिघडू नये म्हणून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
व्हॉईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात डॉ. डिगंबर महाले यांच्या पत्रकारिता, सामाजिक व शैक्षणिक कार्याचा उल्लेख करून त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सोशल मीडियाच्या गैरवापरावर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी करण्यात आली आहे.
मंगळग्रह सेवा संस्थेचे कर्मचारी व परिसरातील व्यावसायिकांनीही दिलेल्या निवेदनात मंदिराची प्रतिमा खराब झाल्यास भाविकांवर, संस्थेवर आणि त्यावर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांवर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका मांडली आहे.
दरम्यान, डॉ. डिगंबर महाले यांनी मंगळवारी जळगाव येथे धर्मदाय विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सर्व संबंधित कागदपत्रे व पुराव्यांसह स्वतंत्र तक्रार दाखल करण्याची तयारी केली असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी पोलिस व प्रशासनाकडून पुढील काय कारवाई होते, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
