धुळेतील अल्पवयीन जानवी ठाकरे आत्महत्या प्रकरण : दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी अमळनेर परीट-धोबी समाजाचे तहसीलदारांना निवेदन.

0

अमळनेर | आबिद शेख 


धुळे येथील गोळीबार टेकडी परिसरातील १५ वर्षीय जानवी जितेंद्र ठाकरे या अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद अमळनेरमध्ये उमटले असून, अमळनेर युवा परीट-धोबी समाज व परदेशी धोबी समाजाच्या वतीने सोमवारी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे संबंधित दोषींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.


समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात, मानसिक छळामुळे एका निष्पाप अल्पवयीन मुलीला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून, या घटनेतील दोषींना कोणतीही दया न दाखवता भारतीय न्याय संहितेतील लागू कलमान्वये तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली.
तसेच या प्रकरणाची जलदगती न्यायालयामार्फत सुनावणी करून दोषींना कठोरातील कठोर शिक्षा सुनावण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत आणि समाजात कायद्याबाबत विश्वास कायम राहील, अशी भूमिकाही निवेदनातून मांडण्यात आली.
यावेळी रविंद्र जाधव, विजय वाघ, उमेश वाल्हे, भरत जावदेकर, दीपक वाल्हे, गंगाराम वाल्हे, गणेश वाल्हे, अनिल मांडोळे, अनिल पवार, परशुराम महाले, सुरेशचंद्र येशी, विकी जाधव, अशोक येशी, अरुण जाधव, लक्ष्मण परदेशी, जयसिंग परदेशी, केशव परदेशी यांच्यासह परीट-धोबी समाजाचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत, “जानवी ठाकरेला न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही,” असा निर्धार व्यक्त केला. गरज पडल्यास व्यापक जनआंदोलन छेडण्याचाही इशारा समाजाच्या वतीने देण्यात आला.
समाजाच्या प्रतिनिधींनी एका अल्पवयीन मुलीच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर निष्पक्ष चौकशी करून कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी केली. तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि तत्परतेने कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed