पातोंडा-दहिवद परिसरात केबल चोरट्यांचा धुमाकूळ; शेतकरी संतप्त, रास्ता रोकोचा इशारा! सहा दिवसांत दोन वेळा चोरी; नवीन केबल टाकल्यानंतरही चोरट्यांचा डल्ला, पोलीस गस्त वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी.

0

अमळनेर /आबिद शेख

अमळनेर  : अमळनेर तालुक्यातील पातोंडा आणि दहिवद परिसरातील शेतशिवारात विहिरी व बोअरवेलच्या विद्युत केबल चोरीच्या घटनांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून चोरीच्या घटना सातत्याने घडत असून, केबल चोरीसोबतच गुरे चोरीचे प्रमाणही वाढले आहे. वारंवार तक्रारी करूनही चोरट्यांचा बंदोबस्त होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलीस, महसूल प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेबाबतही शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

रब्बी हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पंपांची आवश्यकता आहे. सध्या दिवसा वीज उपलब्ध होत असल्याने रात्री शेतात जाण्याची गरज कमी झाली आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत चोरट्यांनी शेतातील विहिरी आणि बोअरवेलमधील महागड्या विद्युत केबल चोरण्याचा सपाटा लावला आहे. चोरी केलेल्या केबलमधील तांबे काढण्यासाठी चोरटे शेतातील ठिबक सिंचनाच्या नळ्या जाळून त्यात केबल वितळवत असल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून या घटना सुरू असून, संबंधित शेतकऱ्यांनी पोलीस, महसूल प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, चोरीच्या घटनांना आळा बसलेला नाही. विशेष म्हणजे, अवघ्या सहा दिवसांत दोन वेळा चोरी झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. पिकांना पाणी देणे अत्यावश्यक असल्याने अनेक शेतकऱ्यांनी उधारीने नवीन केबल खरेदी करून बसवली; मात्र चोरट्यांनी पुन्हा त्याच केबलवर डल्ला मारल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला आहे.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अमळनेर-चोपडा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याची तयारी केली होती. याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्यांची भेट घेतली. पोलिसांनी चोरीच्या घटनांचा पंचनामा करून संबंधित चोरट्यांचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले. तसेच परिसरात रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याचेही सांगितले.

दरम्यान, सध्या दुष्काळाचे सावट असताना शेतकरी आर्थिक संकटाशी झुंज देत आहेत. अशा परिस्थितीत शेतातील विद्युत यंत्रसामग्री आणि गुरे चोरीला जाणे म्हणजे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडण्यासारखे आहे. हिवाळ्याच्या दिवसांत चोरट्यांचा वावर वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांना पकडण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याची भावना व्यक्त करत लोकप्रतिनिधीही या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांना संतप्त शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे. परिसरात नियमित रात्रीची गस्त सुरू करावी, केबल चोरट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा आणि चोरीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. चोरीच्या घटनांवर तातडीने नियंत्रण न मिळाल्यास जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दाद मागण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed