सबगव्हाण टोलनाक्यावर भीषण अपघात; केमिकल टँकरची उभ्या टँकरला धडक, भीषण आग लागून चालकाचा जागीच मृत्यू .

0

24 प्राईम न्यूज 5 Jul 2026


पारोळा : पारोळा तालुक्यातील सबगव्हाण टोलनाक्याजवळ शुक्रवारी (ता. ४) सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. धुळेकडून पारोळ्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या केमिकलने भरलेल्या टँकरने टोलनाक्यावर उभ्या असलेल्या टँकरला मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर केमिकल टँकरने पेट घेतल्याने भीषण अग्नितांडव झाले. या दुर्घटनेत टँकर चालकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला.


प्राथमिक माहितीनुसार, सबगव्हाण टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी एक टँकर उभा होता. त्याचवेळी धुळेकडून येणारा जी.जे. १८ बी.व्ही. ८३१५ क्रमांकाचा केमिकल टँकर भरधाव वेगाने येत असताना त्याचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टँकरने समोर उभ्या असलेल्या टँकरला मागून जोरदार धडक दिली.
धडकेनंतर केमिकलने भरलेल्या टँकरच्या पुढील भागाने क्षणार्धात पेट घेतला. आग इतकी भीषण होती की काही क्षणांतच संपूर्ण केबिन ज्वाळांनी वेढली गेली. यात चालकाला बाहेर पडण्याची संधी न मिळाल्याने त्याचा जागीच होरपळून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दीपक पाटील, तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, शहर महसूल अधिकारी निशिकांत माने, गोपनीय विभागाचे महेश पाटील, भूषण पाटील तसेच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले.
या भीषण अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून मृत चालकाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed