युवासेनेचा पुरवठा विभागाच्या कारभारावर सवाल; अधिकारी आर. जे. शेख यांच्या चौकशीची मागणी नागरिकांच्या तक्रारींचा दाखला देत तहसीलदारांना निवेदन; दोषी आढळल्यास कारवाई करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा.
अमळनेर/आबिद शेख 
अमळनेर : शहरातील पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत युवासेनेने प्रशासनाकडे तक्रारींचा पाढा वाचला आहे. पुरवठा निरीक्षण अधिकारी आर. जे. शेख यांच्या कामकाजाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार अमळनेर यांना निवेदनाद्वारे केली आहे.
युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण पुरुषोत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या या निवेदनात पुरवठा विभागाच्या कामकाजाबाबत नागरिकांकडून होत असलेल्या तक्रारींचा उल्लेख करण्यात आला आहे. विशिष्ट धर्मातील अपात्र व्यक्तींना प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजनांचा लाभ दिला जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून, या बाबींची वस्तुनिष्ठ तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे
.
तसेच नागरिकांशी अरेरावीने बोलणे, खोट्या तक्रारींच्या आधारे कारवाईच्या धमक्या देणे, शासकीय कामांमध्ये विनाकारण विलंब करणे, नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे आणि आर्थिक मागणी केल्याच्या तक्रारींचीही चौकशी व्हावी, असे युवासेनेने नमूद केले आहे.
शासकीय योजनांचा लाभ मिळवताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी गंभीर असून, प्रशासनाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष न करता वरिष्ठ स्तरावर चौकशी करावी. शासकीय कार्यालयातील कामकाज पारदर्शक, निष्पक्ष आणि नागरिकाभिमुख असणे आवश्यक असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करून आरोप सिद्ध झाल्यास कठोर कारवाई करावी, तसेच शासकीय योजनांचा लाभ पात्र नागरिकांना कोणताही भेदभाव न करता मिळावा, अशी मागणी युवासेनेने केली आहे. मागण्यांवर योग्य कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी जळगाव आणि जिल्हा पुरवठा अधिकारी जळगाव यांना पाठविण्यात आल्या आहेत.
यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण पुरुषोत्तम पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख पंकज संतोष शेटे, शहर संघटक पंकज अरुण चौधरी, अल्पसंख्याक शहरप्रमुख शेख अल्ताफ राजा फारुख, राहुल साहेबराव पाटील, जयेश रवींद्र चव्हाण, सनी पाटील, यश मोहन साळुंखे, गौरव रवींद्र पाटील, मनीषा हरिश्चंद्र चौधरी, दिनेश पाटील, शेखर देशमुख आणि अविनाश पवार आदी उपस्थित होते.
जनतेच्या हक्कांसाठी आणि पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ पारदर्शकपणे मिळावा यासाठी युवासेना प्रयत्नशील असून, प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घ्यावी, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

