धरती आबा योजनेच्या कामांना वेग द्या; प्रलंबित कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – खासदार स्मिताताई वाघ.

0

अमळनेर/आबिद शेख
अमळने : जळगाव लोकसभा मतदारसंघातील धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत सुरू असलेल्या विकासकामांना अधिक गती देऊन प्रलंबित कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे निर्देश खासदार स्मिताताई वाघ यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत धरती आबा योजनेत समाविष्ट ३० जनजाती गावांतील विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यातील कामांची प्रगती, नव्याने समाविष्ट करता येणारी विकासकामे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनजाती बांधवांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासंदर्भात संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

बैठकीत खासदार स्मिताताई वाघ यांनी योजनेत अद्याप समाविष्ट न झालेल्या ३७ जनजाती गावांचाही प्रश्न उपस्थित केला. काही तांत्रिक कारणांमुळे या गावांचा समावेश झालेला नसल्याचे सांगत, त्यांना लवकरात लवकर योजनेचा लाभ मिळावा यासाठी आपण यापूर्वी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला असून शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
जनजाती गावांचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधा, मूलभूत सेवा आणि शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि अधिक गतिमान पद्धतीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे (IAS), जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर (IAS), आदिवासी एकात्मिक प्रकल्प यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, जळगाव लोकसभा मतदारसंघातील गटविकास अधिकारी तसेच धरती आबा योजनेतील ३० गावांचे ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed