अमळनेर नगरपरिषदेच्या अधिकृत कत्तलखान्यात गोवंश कत्तलीच्या तक्रारी; विहिंप-बजरंग दलाचे आठ दिवसांचे अल्टिमेटम कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करून जागा जमीनदोस्त करण्याची मागणी; कारवाई न झाल्यास तीव्र लोकशाही आंदोलनाचा इशारा

0

अमळनेर /आबिद शेख

अमळनेर : अमळनेर नगरपरिषदेच्या अधिकृत कत्तलखान्यात वारंवार गोवंश कत्तल होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद व बजरंग दल, अमळनेर प्रखंड यांच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले. कत्तलखान्यातील कथित गोवंश कत्तलीच्या प्रकारांची तातडीने निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करून त्याची जागा निष्क्रिय करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांसाठी संघटनांनी प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नगरपरिषदेच्या अधिकृत कत्तलखान्यात वारंवार गोवंश कत्तलीच्या तक्रारी समोर येत असून, नगरपरिषद प्रशासन, संबंधित कर्मचारी आणि देखरेख यंत्रणेकडून प्रभावी नियंत्रण, नियमित तपासणी व कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. या प्रकारामुळे गोवंशप्रेमी नागरिकांच्या भावना दुखावल्या जात असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कत्तलखान्यातील तक्रारींची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, कत्तलखान्याची नियमित तपासणी, पशुवैद्यकीय तपासणी, जनावरांच्या आवक-जावक नोंदी व संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्यात यावी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कत्तलखाना चालक व संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच कत्तलखान्याचा परवाना रद्द करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

यासोबतच कत्तलखाना तात्काळ बंद करून त्याचे बांधकाम कायमस्वरूपी निष्क्रिय करण्याची व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित जागा जमीनदोस्त करण्याची मागणीही करण्यात आली आहे. गोवंश कत्तलीसाठी वापरल्या जाणाऱ्या परिसराची तपासणी करून गोवंश संरक्षण कायद्यांतर्गत दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी भूमिका संघटनांनी मांडली आहे.

नगरपरिषद प्रशासनाने निवेदनावर केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल आठ दिवसांच्या आत संघटनांना द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. नगराध्यक्षांनी गोवंश संरक्षणाच्या विषयावर स्पष्ट भूमिका घेऊन प्रत्यक्ष कारवाई करावी. केवळ निवडणुकीपुरते गोवंश संरक्षणाचे मुद्दे उपस्थित न करता प्रत्यक्ष कृती करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

आठ दिवसांच्या आत कत्तलखान्यावर ठोस कारवाई करून तो कायमस्वरूपी बंद करण्याची प्रक्रिया सुरू न झाल्यास नगराध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी नगरपरिषद प्रशासन व संबंधित लोकप्रतिनिधींवर राहील, असा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

या निवेदनावर सचिन चौधरी (प्रखंड संयोजक), विश्वनाथ मिल्की (प्रखंड मिस्त्री), स्वप्निल पाटील (प्रखंड गो रक्षक) व शहर गो रक्षक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed