मांडळच्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्याला गळतीचे ग्रहण; दुरुस्तीसाठी निधीची मागणी! डॉ. दीपक पाटील यांचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना निवेदन; बंधाऱ्याची दुरवस्था कायम राहिल्यास परिसरातील गावांवर पाणीटंचाईचे संकट.

0

अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : तालुक्यातील मांडळ गावाजवळ पांझरा नदीवर असलेल्या सुमारे २०० वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन दगडी बंधाऱ्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. बंधाऱ्याला ठिकठिकाणी तडे गेल्याने मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असून, पाण्यासोबत वाळूही वाहून जात आहे. त्यामुळे या ऐतिहासिक बंधाऱ्याच्या अस्तित्वासह परिसरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी सभापती तथा विद्यमान ग्रामपंचायत सनेरदस्य डॉ. दीपक पंढरीनाथ पाटील यांनी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मांडळ येथील हा बंधारा परिसरातील जलस्रोतांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मांडळ, वावडे, जवखेडा यांसह आसपासच्या गावांमधील पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची पाणीपातळी टिकून राहण्यास या बंधाऱ्याची मोठी मदत होते. मात्र, बंधाऱ्याच्या खालून होणारी पाणीगळती आणि वाळूचा होणारा उपसा यामुळे भविष्यात गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

बंधारा फुटल्यास साठलेली वाळू वाहून जाण्याबरोबरच परिसरातील विहिरींची पाणीपातळी खालावून गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे संभाव्य संकट टाळण्यासाठी पावसाळ्याची किंवा परिस्थिती गंभीर होण्याची वाट न पाहता तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे डॉ. पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.

बंधाऱ्याची तांत्रिक तपासणी करून संपूर्ण दुरुस्ती करावी तसेच त्यावर दोन फूट उंचीचे काँक्रीटचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. यामुळे पाणीसाठा टिकून राहण्यास मदत होऊन परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

या मागणीच्या निवेदनाच्या प्रती लघु पाटबंधारे विभाग, धुळे आणि जिल्हाधिकारी, धुळे यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. आता जलसंपदा विभाग या गंभीर समस्येकडे किती गांभीर्याने पाहतो आणि ब्रिटिशकालीन बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी कधी मंजूर करतो, याकडे मांडळसह परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed