अमळनेरातील अलफैज उर्दू गर्ल्स हायस्कूलमध्ये खळबळ; सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेच्या हस्तक्षेपाचा आरोप, शिक्षक-कर्मचाऱ्यांची पोलीस ठाण्यात धाव.

0

अमळनेर | आबिद शेख
अमळनेर येथील अलफैज उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रशासकीय कारभारावरून मोठा वाद निर्माण झाला असून, शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेच्या कथित अनधिकृत हस्तक्षेपाबाबत तसेच नवीन मुख्याध्यापिकेच्या नियुक्तीतील कथित अनियमिततेबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर आवश्यक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.


तक्रारीनुसार, माजी मुख्याध्यापिका सौ. नसीमबानो शेख इब्राहिम या ३१ मे २०२६ रोजी नियमानुसार सेवानिवृत्त झाल्या. मात्र, सेवानिवृत्तीनंतरही कोणताही अधिकृत आदेश अथवा जबाबदारी नसताना त्या शाळेत येऊन प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा गंभीर आरोप शिक्षकांनी केला आहे.
तसेच, संस्थेच्या सचिवांनी सेवाज्येष्ठतेचा विचार न करता नवीन मुख्याध्यापिकेची बेकायदेशीर नियुक्ती केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. नवीन मुख्याध्यापिकेला चुकीचे मार्गदर्शन करून शिक्षकांवर मानसिक दबाव टाकला जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शिक्षकांनी केलेल्या आरोपांमध्ये जुने हजेरी पुस्तक हटवून नवीन हजेरी पुस्तक सुरू करणे, त्यावर १५ दिवसांनंतर सह्या घेण्यास भाग पाडणे, प्रश्न विचारणाऱ्या शिक्षकांना दमदाटी करणे, विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे तसेच नोकरीवरून कमी करण्याची भीती दाखविणे यांचा समावेश आहे.
यापूर्वी सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक पदाची मागणी करणारे सेवानिवृत्त शिक्षक जावेद बेग हारून बेग यांनाही अशाच प्रकारे धमकावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित घटनेची ध्वनिफीत आपल्या ताब्यात असल्याचा दावाही तक्रारदारांनी केला आहे.
तसेच, पालकांमध्ये शिक्षकांविरोधात गैरसमज निर्माण करणे, चुकीची माहिती पसरविणे आणि शाळेच्या दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण केल्यामुळे शिक्षक, कर्मचारी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संबंधित सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेला सक्षम प्राधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत जबाबदारी देण्यात आलेली नसल्यास त्यांचा शाळेच्या कारभारातील हस्तक्षेप तात्काळ थांबवावा, नवीन मुख्याध्यापिकेच्या नियुक्तीची चौकशी करून आवश्यक प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, मागण्यांवर योग्य ती कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही तक्रारदारांनी प्रशासनाला दिला आहे.
तक्रारदार शिक्षकांचे नाव
काझी असलामोद्दीन अमिरोद्दीन (उपशिक्षक)
आरिफ शेख इस्लाम (उपशिक्षक)
मोहम्मद इसहाक अ. रहीम (उपशिक्षक)
शेख मोहम्मद मुश्ताक अ. सत्तार (उपशिक्षक)
सुरैय्या रोशन खैरोद्दीन शेख (उपशिक्षक)
इब्राहिम शेख इस्माईल (उपशिक्षक)
मोहियोद्दीन शेख कमरोद्दीन (उपशिक्षक)
आरिफुद्दीन शेख बदुद्दीन (उपशिक्षक)
मसुदखान इब्राहिम खान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed