आमदार अनिल पाटील यांची वाडी संस्थानाला भेट; भडगाव येथे वारीत सहभागी होत प.पू. संत प्रसाद महाराजांशी सविस्तर चर्चा, १५ कोटींच्या विशेष निधीसाठी मुख्यमंत्रींकडे मागणी.

0

अमळनेर | आबिद शेख
विठ्ठल-रुख्मिणीच्या कृपाआशीर्वादाने आणि राज्य शासनाच्या सहकार्याने अमळनेर येथील श्री संत सखाराम महाराज वाडी मंदिराचे भव्य व दर्जेदार नवनिर्माण करण्यात येईल. मंदिराला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांमधून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी दिली.


वाडी संस्थानातील आगीच्या घटनेनंतर आमदार अनिल पाटील यांनी मंदिर परिसराला भेट देऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी मंदिराच्या विश्वस्त मंडळाशी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी तसेच प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांशी पुनर्बांधणीच्या आराखड्याबाबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी भडगाव येथे प्रत्यक्ष वारीत सहभागी होत प.पू. संत प्रसाद महाराजांची भेट घेत मंदिराच्या पुनर्बांधणीसंदर्भात सखोल विचारविनिमय केला.
यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की, श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थान हे केवळ अमळनेरचे नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो वारकरी व भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे मंदिराचे नवनिर्माण अत्यंत दर्जेदार, भव्य आणि शक्य तितक्या लवकर पूर्ण व्हावे, यासाठी शासनस्तरावर सर्व आवश्यक प्रयत्न सुरू आहेत.
ते म्हणाले की, सध्या वाडी संस्थान पर्यटन विभागाच्या ‘ब’ वर्गात समाविष्ट आहे. या संस्थानाचा ‘अ’ वर्गात समावेश करण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात पर्यटन विभागासह राज्य शासनाकडून अधिक निधी उपलब्ध होण्यास मदत होईल. यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचना तहसीलदार रुपेशकुमार सुराणा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
विश्वस्त मंडळाशी झालेल्या बैठकीत पुनर्बांधणीच्या पुढील प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आगीच्या वेळी तत्परतेने कार्य करून मोठे नुकसान टाळणाऱ्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांचेही आमदार पाटील यांनी विशेष कौतुक केले.
या भेटीदरम्यान पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, मुख्याधिकारी गणेश शिंदे, संस्थानचे राजेंद्र भामरे, महेश कोठावदे, उदय देशपांडे, अतुल कुलकर्णी, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी संत प्रसाद महाराजांचा दूरध्वनीवर संवाद


भडगाव येथे वारीदरम्यान आमदार अनिल पाटील यांनी आपल्या मोबाईलद्वारे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी प.पू. संत प्रसाद महाराजांचा संवाद घडवून आणला. यावेळी वाडी संस्थानातील आगीच्या दुर्घटनेमुळे मंदिराच्या ऐतिहासिक, धार्मिक व आध्यात्मिक वारशाचे मोठे नुकसान झाल्याबद्दल खंत व्यक्त करत उपमुख्यमंत्री पवार यांनी मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाही दिली.
मुख्यमंत्र्यांकडे १५ कोटींच्या विशेष निधीची मागणी
आमदार अनिल पाटील यांनी संत प्रसाद महाराजांना माहिती देताना सांगितले की, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वाडी संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी विशेष बाब म्हणून १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच विधिमंडळात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आपत्कालीन निधीचीही मागणी शासनाकडे करण्यात आली असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शासन याबाबत सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘मंदिराचे वैभव पुन्हा उभे राहील’ – संत प्रसाद महाराज
यावर प.पू. संत प्रसाद महाराज म्हणाले, “साक्षात विठ्ठल माऊली आणि लाखो वारकरी-भक्तांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याने कोणतीही चिंता नाही. मंदिराचे वैभव पुन्हा उभे राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराजांचे आशीर्वाद घेतल्यानंतर आमदार अनिल पाटील यांनी त्यांना पुढील वारीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर संत प्रसाद महाराज दिंडीसह पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी, भाविक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed