अमळनेर–धार रस्त्याच्या १ कोटी ८८ लाखांच्या कामाचे भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शुभारंभ; सौ. जयश्री पाटील यांची प्रमुख उपस्थिती.
अमळनेर–आबिद शेख 
अमळनेर : अमळनेर ते धार या ग्रामीण भागातील दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या रस्त्याच्या सुधारणा कामाला अखेर सुरुवात होणार असून, तब्बल १ कोटी ८८ लाख रुपये खर्चाच्या या कामाचे भूमिपूजन रविवार, १५ नोव्हेंबर रोजी धार येथे उत्साहात संपन्न झाले. माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. जयश्री अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोंढाळे–फाफोरे–अमळनेर–धार–मारवड–निम–कपिलेश्वर या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ४९ वरील किमी ३३/३०० ते ४०/०० (अमळनेर ते धार) या टप्प्यात रस्त्याची सुधारणा करण्यात येणार आहे. या कामासाठी १ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यामुळे धार परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर होण्यास मदत होणार आहे.
रस्त्याची सुधारणा झाल्यानंतर शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतीमालाची वाहतूक सुलभ होण्यासोबतच शिक्षण, आरोग्य आणि व्यापाराच्या दृष्टीनेही या रस्त्याचा फायदा होणार आहे. ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था मजबूत झाल्याने परिसराच्या आर्थिक व सामाजिक विकासालाही चालना मिळणार आहे.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी पायाभूत सुविधा सक्षम करणे आवश्यक असून, त्याच दृष्टिकोनातून या रस्त्याच्या कामाला प्राधान्य देण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून जाणवणाऱ्या रस्त्याच्या समस्येवर या कामामुळे तोडगा निघण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
याप्रसंगी माजी सरपंच गणेश धोंडू पाटील, यशवंत शंकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अमळनेर तालुकाध्यक्ष अलीम मुजावर, यशवंत धोंडू पाटील, किरण हिम्मतराव पाटील (मालपूर), किरण भाईदास पाटील (मालपूर), संजय टेलर, बाबू पेंटर, उमाकांत भाऊसाहेब, डॉ. विलास पाटील, भानुदास पाटील, रज्जाक शाह, माजी सरपंच वसंत काटे, सतीश उत्तम पाटील, बाळू ड्रायव्हर, शौकत सय्यद, सत्तार मुजावर, खाटीक सर यांच्यासह परिसरातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमळनेर–धार रस्त्याच्या या कामामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला नवी गती मिळणार असून, दळणवळणाच्या सुविधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

