अमळनेरात अवैध गोवंश कत्तलीवर एलसीबीची धडक कारवाई; ११ जण ताब्यात, ६ फरार.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) शुक्रवारी पहाटे अमळनेर शहरातील पारधीवाडा व जपान जीन परिसरातील अवैध गोवंश कत्तलीच्या दोन ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी करत मोठी कारवाई केली. या कारवाईत ११ जणांना ताब्यात घेण्यात आले असून ६ संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

छापेमारीदरम्यान पोलिसांनी सुमारे १,५७५ किलो संशयित गोवंशाचे मांस, कत्तलीसाठी वापरण्यात येणाऱ्या कुऱ्हाडी, चाकू, कोयते, तराजू तसेच इतर साहित्य जप्त केले. जप्त केलेल्या साहित्याची अंदाजे किंमत ३ लाख १८ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याशिवाय जपान जीन परिसरातील एका शेडमधून तीन जिवंत बैलांची सुटका करण्यात आली. या बैलांना सुरक्षितपणे गोशाळेत पाठविण्यात आले असून त्यांची किंमत सुमारे १ लाख ५५ हजार रुपये आहे. जप्त साहित्य व जनावरांची एकूण किंमत ४ लाख ७३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत चाललेल्या या विशेष कारवाईत हसनखान गुलाबखान पठाण, मोहसीनखान हसनखान पठाण, फराजखान हमीदखान कुरेशी, अर्शदखान अजीजखान कुरेशी, रियाज अहमद अब्दुल शकूर कुरेशी, तनवीर शेख ताहेर कुरेशी, जावेदखान सुलेमानखान कुरेशी, अब्दुल शेख नूरा कुरेशी, अजीज शेख नजीर कुरेशी, अल्ताफखान अजीजखान कुरेशी आणि शरीफ शेख अकबर कुरेशी यांना ताब्यात घेण्यात आले.
तर इकबाल शेख, जहांगीर शेख, आरिफ अजीज कुरेशी, जाबिर खान, जहीरखान आणि शरीफ खान हे आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
