संत सखाराम महाराज वाडी मंदिर पुनर्बांधणीसाठी १५ कोटींचा विशेष निधी द्या; आमदार अनिल पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट; शासन सकारात्मक भूमिका घेईल, दिली ग्वाही.

0

अमळनेर | आबिद शेख 


अमळनेर येथील श्री सद्गुरू संत सखाराम महाराज वाडी संस्थानाच्या पुनर्बांधणीसाठी विशेष बाब म्हणून १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार तथा माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी गुरुवारी (३ जुलै) मुंबईतील विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली. यावेळी त्यांनी संस्थानाला लागलेल्या भीषण आगीची माहिती देत तातडीने पुनर्बांधणीसाठी शासनाने मदत करावी, अशी विनंती केली.


मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात आमदार पाटील यांनी नमूद केले की, खान्देशचे ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री सद्गुरू संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला १ जुलै २०२६ रोजी रात्री भीषण आग लागली. या आगीत सुमारे २५० वर्षे जुना ऐतिहासिक लाकडी गाभारा पूर्णपणे जळून खाक झाला असून प्राथमिक अंदाजानुसार सुमारे १५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
या दुर्घटनेत गाभाऱ्याचे ऐतिहासिक व धार्मिक वैभव नष्ट झाले असले, तरी सुदैवाने मंदिराची मुख्य रचना व श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्ती सुरक्षित राहिल्या आहेत. तसेच कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टीने स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईपर्यंत मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.
वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या
आमदार पाटील यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, २५ जुलै रोजी आषाढी एकादशी असून दरवर्षी खान्देशासह राज्याच्या विविध भागांतून हजारो वारकरी व भाविक संत सखाराम महाराज वाडी संस्थानात विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. सुमारे अडीचशे वर्षांची परंपरा लाभलेले हे पुरातन लाकडी मंदिर आगीत जळाल्याने लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या असून संस्थानाची पुनर्बांधणी अत्यंत आवश्यक आहे.
त्यामुळे शासनाने तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करून पर्यटन विकास अथवा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत प्रस्ताव मागवावा आणि विशेष बाब म्हणून सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून संस्थानाचे पुनरुज्जीवन करावे, अशी मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अनिल पाटील यांच्या निवेदनाची दखल घेत शासन या विषयावर सकारात्मक भूमिका घेईल, अशी ग्वाही दिल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली. त्यामुळे संत सखाराम महाराज वाडी संस्थानाच्या पुनर्बांधणीसाठी शासनस्तरावर लवकरच ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed