अमळनेरच्या दिनेश बागडेचा महापौर चषकावर कब्जा; ‘स्ट्रॉंग मॅन’ किताबाचाही मान.
अमळनेर | आबिद शेख

मुंबईतील बोरिवली येथे आयोजित पाचव्या पॅरा ऑलिम्पिक पॉवर लिफ्टिंग महापौर चषक स्पर्धेत अमळनेरच्या दिनेश शशी बागडे यांनी दमदार कामगिरी करत महापौर चषकावर नाव कोरले. याशिवाय सर्व स्पर्धकांमधून ‘बेस्ट लिफ्टर’ म्हणून त्यांची निवड झाली असून त्यांना ‘स्ट्रॉंग मॅन’ पदकाने गौरविण्यात आले.

पॅरा ऑलिम्पिक पॉवर लिफ्टिंग असोसिएशन, मुंबई यांच्या वतीने २८ जून रोजी बोरिवली येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १०७ किलो वजन गटात दिनेश बागडे यांनी तब्बल १७० किलो बेंच प्रेस उचलून महापौर चषक पटकावला. उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांनी सर्व स्पर्धकांमधून बेस्ट लिफ्टरचा बहुमानही मिळवला.
दिनेश बागडे यांची आतापर्यंतची क्रीडा कारकीर्दही उल्लेखनीय राहिली आहे. त्यांनी दोन वेळा ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत पदक, चार वेळा राष्ट्रीय स्तरावरील पदके, सहा वेळा राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पदके, तसेच ओपन पॉवर लिफ्टिंगमध्ये सहा वेळा ‘बेस्ट लिफ्टर स्ट्रॉंग मॅन’ हा मान मिळवला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल दिनेश बागडे यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कामगिरीमुळे अमळनेरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
