न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा उद्यापासून बेमुदत संपाचा एल्गार! समान काम, समान वेतनाच्या मागणीसाठी राज्यभरातील कर्मचारी आक्रमक; संप यशस्वी करण्याचा अमळनेर न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा निर्धार.

0

अमळनेर/ आबिद शेख

अमळनेर : समान कामासाठी समान वेतन लागू करावे, या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीसाठी महाराष्ट्रातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आता बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. उद्यापासून राज्यभरातील न्यायालयीन कर्मचारी संपावर जाणार असून, या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवून संप यशस्वी करण्याचा निर्धार अमळनेर येथील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

उच्च न्यायालयातील कर्मचारी आणि राज्यातील दुय्यम न्यायालयांमधील कर्मचारी हे न्यायव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक आहेत. दुय्यम न्यायालयांतील कर्मचाऱ्यांवर कामाचा अधिक भार असतानाही त्यांच्या वेतनश्रेणीत मोठी तफावत असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. उच्च न्यायालयीन कर्मचाऱ्यांना २००६ पासून लागू असलेली वेतनश्रेणी राज्यातील सर्व दुय्यम न्यायालयांतील कर्मचाऱ्यांनाही लागू करावी, अशी महासंघाची प्रमुख मागणी आहे.

या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचारी महासंघ गट-क, महाराष्ट्र ज्युडिशियल स्टेनोग्राफर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य न्यायालयीन बेलीफ कर्मचारी महासंघ तसेच न्यायालयीन गट-ड कर्मचारी महासंघ या संघटनांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र, वारंवार निवेदने देऊनही मागणीची पूर्तता होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनश्रेणीबाबतचा प्रस्ताव ३१ जानेवारी २०२५ रोजी शासनाकडे सादर केला होता. मात्र, अद्याप या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यापूर्वी १६ व १७ सप्टेंबर रोजी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले होते. तरीही शासनाकडून ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आला आहे.

अमळनेर येथे न्यायालयीन कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र येत संपात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच सेवानिवृत्त कर्मचारी महासंघानेही या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. या मागणीच्या समर्थनार्थ उद्या जळगाव येथे सेवानिवृत्त कर्मचारी एकदिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत. समान काम, समान वेतनाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed