अमळनेरात अवैध कत्तलीच्या ठिकाणी पोलिसांचा छापा; ५७० किलो मांसासह ५० किलो कातडी जप्त! पारधीवाडा परिसरातील कत्तलखान्यावर पहाटे कारवाई; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पाच आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी.
अमळनेर /आबिद शेख

अमळनेर : ऑपरेशन ऑल आऊट मोहिमेंतर्गत अमळनेर पोलिसांनी १६ नोव्हेंबर रोजी पहाटे पारधीवाडा परिसरातील कत्तलखान्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत विविध जनावरांचे सुमारे ५७० किलो मांस, ५० किलो कातडी तसेच कत्तलीसाठी वापरण्यात येणारी २८ कुऱ्हाडी, सुरी व कोयते जप्त करण्यात आले. याप्रकरणी सात जणांविरुद्ध महाराष्ट्र पशुसंवर्धन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ऑपरेशन ऑल आऊट मोहिमेअंतर्गत कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार अमळनेरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना पारधीवाडा परिसरातील मुस्लिम कब्रस्तानाजवळील कत्तलखान्यात जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे १६ नोव्हेंबर रोजी पहाटे सुमारे चार वाजता पोलीस पथकाने घटनास्थळी छापा टाकला.
पोलिसांची चाहूल लागताच इकबाल कुरेशी आणि बाबा कुरेशी हे दोघे घटनास्थळावरून पळून गेले. दरम्यान, पोलिसांनी परिसराला घेराव घालून इतरांना जागेवरच थांबण्याच्या सूचना दिल्या. घटनास्थळी तपासणी केली असता सुमारे १८ हजार रुपये किमतीचे ३०० किलो गोवंशाचे मांस, सहा हजार रुपये किमतीचे १०० किलो म्हशीचे मांस आणि अन्य १७० किलो मांस आढळून आले. याशिवाय हाडे, शिंगे, सुमारे ५० किलो कातडी आणि कत्तलीसाठी वापरण्यात येणारी २८ कुऱ्हाडी, सुरी व कोयते असा एकूण ४४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
पोलिसांनी शेख रमजान शेख मुख्तार, अब्दुल अजीज अब्दुल शकुर, अल्ताफ खा अजीज खा पठाण, सलमान रजा सलीम अहमदखान, शेख मुख्तार शेख बिस्मिल्ला (सर्व रा. फरशी रोड, अमळनेर), तसेच इकबाल कुरेशी आणि बाबा कुरेशी (रा. अमळनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. जप्त करण्यात आलेले मांस, हाडे, कातडी व शिंगे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने खड्डा खोदून पुरून नष्ट करण्यात आली.
याप्रकरणी महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९७६ मधील कलम ५, ५(अ), ५(ब), ५(क), ९, ९(अ), प्राणी छळ प्रतिबंधक कायदा १९६० मधील कलम ११ तसेच भारतीय न्यायसंहिता कलम ३२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती वाजे यांनी त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

