आमदार अनिल पाटील यांचे जिल्हा बँकेत पुन्हा वर्चस्व; जयश्री पाटील बिनविरोध! भाजप उमेदवाराची माघार ठरली निर्णायक; जिल्हा बँकेच्या माध्यमातून जयश्री पाटील यांची सहकार क्षेत्रात दमदार एंट्री, अमळनेरमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष.

0

अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अमळनेर तालुका सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषद सदस्या सौ. जयश्री पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. भाजपचे उमेदवार प्रफुल्ल पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने जयश्री पाटील यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. या घडामोडीमुळे जिल्हा बँकेतील आमदार अनिल पाटील यांचे राजकीय वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

 

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटल्यानंतर उमेदवारी अर्ज माघारीच्या प्रक्रियेला वेग आला होता. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या अमळनेर तालुका सोसायटी मतदारसंघात भाजप उमेदवार प्रफुल्ल पवार यांनी माघार घेतल्याने जयश्री पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. या निर्णयाने आमदार अनिल पाटील यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

बिनविरोध निवडीची बातमी समजताच अमळनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. जयश्री पाटील यांचे विविध स्तरांतून अभिनंदन व सत्कार करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी, बाजार समितीचे संचालक, शेतकी संघाचे संचालक, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी पदाधिकारी, विविध विकास सोसायट्यांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, युवक व महिला कार्यकर्ते तसेच हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांची नवी जबाबदारी

आमदार अनिल पाटील यांचा अमळनेर तालुक्यातील सहकार क्षेत्रावर अनेक वर्षांपासून प्रभाव राहिला आहे. अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शेतकी संघ या महत्त्वाच्या संस्थांवर त्यांच्या नेतृत्वाखालील गटाचे वर्चस्व कायम आहे. यापूर्वी त्यांनी जिल्हा बँकेतही प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, नव्या कायद्यातील तरतुदींमुळे यंदाच्या निवडणुकीत स्वतः उमेदवारी न करता त्यांनी पत्नी जयश्री पाटील यांना अमळनेर तालुका सोसायटी मतदारसंघातून संधी दिली.

जयश्री पाटील यांनी यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य आणि अमळनेरच्या माजी नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय कामाचा अनुभव असलेल्या जयश्री पाटील यांची सक्षम महिला नेतृत्व म्हणून ओळख आहे. आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून त्यांच्यावर सहकार क्षेत्रातील नवी जबाबदारी येणार आहे.

त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे आमदार अनिल पाटील यांच्या राजकीय गटाला जिल्हा बँकेत महत्त्वाचे स्थान मिळाले असून अमळनेरच्या सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांमध्येही या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed