अमळनेरात पहाटे पोलिसांचे धडक कॉम्बिंग ऑपरेशन; १२ वॉन्टेड आरोपी जेरबंद, गुटखा व हातभट्ट्यांवर मोठी कारवाई.

0

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर शहरात पोलिसांनी बुधवारी (२ जुलै) पहाटे मोठ्या प्रमाणावर कॉम्बिंग ऑपरेशन राबवत गुन्हेगारीविरोधात धडक कारवाई केली. या संयुक्त मोहिमेत १२ वॉन्टेड आरोपींना अटक करण्यात आली असून, गुटखा विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली. तसेच शहर व परिसरातील सात गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, शरद काकळीज, भगवान शिरसाठ, कविता ठाणगे, स्थानिक गुन्हे शाखेचे जितेंद्र वलटे यांच्यासह आरसीपी पथके, अमळनेर डीबी पथक, एलसीबी, उपविभागातील पोलीस कर्मचारी तसेच चोपडा येथील पोलिसांचा सहभाग होता.
पहाटे साडेतीन वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत शहरातील विविध भागांमध्ये एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान ११० सराईत गुन्हेगारांच्या घरांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७० गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले व्यक्ती आढळून आले. त्यातील ५२ जणांची माहिती नोंदवून त्यांना भविष्यात कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात सहभागी न होण्याची ताकीद देण्यात आली.
दरम्यान, न्यायालयात गैरहजर राहिलेल्या सहा आरोपींना अटक वॉरंट बजावून ताब्यात घेण्यात आले. याशिवाय विविध गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या १२ वॉन्टेड आरोपींनाही अटक करण्यात आली.
अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून गुटख्याची विक्री करणाऱ्यांविरोधातही पोलिसांनी कारवाई केली. फरशी रोड परिसरातील आकाश बाबूलाल सोनवणे (वय २०) याच्याकडून सुमारे २० हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. तसेच सिंधी कॉलनीतील सुगणामल किसनचंद बठेजा (वय ७५) याच्याकडून सुमारे ६० हजार रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला.
याशिवाय सानेनगर, म्हाडा कॉलनी, पिळोदा, चांदणी कुहे, कंजरवाडा, पिंपळी आणि पैलाड परिसरातील सात गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर धाड टाकण्यात आली. या कारवाईत सुमारे सव्वा लाख रुपयांची गावठी दारू व दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे रसायन जप्त करून नष्ट करण्यात आले. तसेच सर्व हातभट्ट्या उद्ध्वस्त करून अवैध दारू निर्मितीवर आळा घालण्यात आला.
गुन्हेगारी, अवैध धंदे आणि फरार आरोपींविरोधातील अशा धडक मोहिमा पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed