संत सखाराम महाराज वाडी संस्थानात भीषण आग; मदतकार्यात हिंदू–मुस्लिम ऐक्याचे दर्शन हभप प्रसाद महाराज दिंडीसह पंढरपूरकडे रवाना झाल्यानंतर रात्रीची घटना; नागरिक, अग्निशमन दल आणि प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न.

0

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर येथील श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थान परिसरात मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सकाळी हभप प्रसाद महाराज संत सखाराम महाराजांची दिंडी घेऊन पंढरपूरकडे रवाना झाले होते. त्यानंतर रात्री अचानक घडलेल्या या घटनेमुळे भाविकांमध्ये चिंता निर्माण झाली.
प्राथमिक माहितीनुसार, सीसीटीव्ही यंत्रणेमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे विठ्ठल–रुख्मिणी मंदिराच्या वरच्या बाजूस असलेल्या प्रसाद महाराज यांच्या बैठक खोलीत आग लागली. मंदिराचा मोठा भाग लाकडी बांधकामाचा असून दरवर्षी ऑइल पेंट करण्यात येत असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले.

आगीची माहिती मिळताच नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. अमळनेर व पारोळा येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. खाजगी वाहने, टँकर आणि स्थानिकांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे तसेच पारोळा पालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी तत्काळ अग्निशमन दल पाठवून स्वतःही घटनास्थळी दाखल होत परिस्थितीचा आढावा घेतला. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू ठेवले.
घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाल्याने सुरुवातीला मदतकार्यात काही अडथळे निर्माण होत होते. दरम्यान, आमदार अनिल पाटील यांनी चोपडा, शिरपूर व पारोळा येथून अतिरिक्त अग्निशमन वाहने उपलब्ध करून देण्याची विनंती केली. पारोळा पालिकेची अग्निशमन गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली. तसेच आर. बी. कन्स्ट्रक्शनमार्फत पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात आले.
दरम्यान, अमळनेर शहर पत्रकार संघाने सोशल मीडियाच्या माध्यमातून खाजगी टँकरधारकांना मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.
या मदतकार्यात नगरसेवक अनिल महाजन, पंकज चौधरी, बाळा संदनशिव, पंकज भोई, गोपी कासार, सूरज परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन राजपूत, जितेंद्र ठाकुर, नितीन निळे, विजय पाटील, संजय कौतीक पाटील, महेंद्र पाटील, शोएब शेख, अरशद खान, हुजैफा पठान, इमरान पठान, नईम पठान, नसीब पठान, राजा पठान, फरहान शेख, आकिब पठान, रिजवान खान यांच्यासह अनेक मुस्लिम बांधवांनी सक्रिय सहभाग नोंदवत आग विझविण्यासाठी सहकार्य केले. महाराजांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की
आग शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागली आहे. Cctv बॉक्स जवळ जळल्याने आग भडकली, वारीला निघाल्यामुळे परत फिरण्याचा काही प्रश्नच नाही. आई गेली त्यावेळेस परत फिरलो नाही तर आता कसे परत फिरणार.
भाविकांनी काळ्जी घ्यावी.
या संपूर्ण घटनेत मदतकार्यात सहभागी झालेल्या सर्व समाजघटकांनी एकत्र येत मानवतेचा संदेश दिला. विशेष म्हणजे या प्रसंगी हिंदू–मुस्लिम ऐक्याचे प्रेरणादायी दर्शन घडले आणि संकटाच्या काळात अमळनेरकर एकदिलाने उभे राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed