आजपासून एचएसआरपी नंबर प्लेट सक्तीची; नियमभंग केल्यास १ हजारांचा दंड, आरटीओ सेवा होणार बंद.
24 प्राईम न्यूज 1 Jul 2026

राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसविणे आता सक्तीचे करण्यात आले असून, १ जुलैपासून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. निर्धारित मुदतीनंतर एचएसआरपी न बसविलेल्या वाहनधारकांकडून मोटार वाहन कायद्यानुसार १ हजार रुपयांपर्यंत दंड वसूल केला जाणार आहे.

परिवहन विभागाच्या माहितीनुसार, एचएसआरपी नसलेल्या वाहनांसाठी आरटीओ कार्यालयातील अनेक महत्त्वाच्या सेवा तात्पुरत्या बंद करण्यात येणार आहेत. यामध्ये वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, वाहनावर कर्जबोजा चढविणे अथवा उतरविणे, पुनर्नोंदणी, वाहनातील तांत्रिक बदल आणि परवाना नूतनीकरण यांसारख्या सेवांचा समावेश आहे. मात्र वाहन फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी ही अट लागू राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, ३० जूनपूर्वी अधिकृतपणे एचएसआरपी बसविण्यासाठी अपॉईंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना दंडात्मक कारवाईतून तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे.
राज्यात एचएसआरपी बसविण्याचे काम तीन विभागांमध्ये विभागण्यात आले असून त्यासाठी संबंधित कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने अधिकृत शुल्कही निश्चित केले आहे. त्यानुसार दुचाकी वाहनांसाठी ४५० रुपये, तीनचाकी वाहनांसाठी ५०० रुपये आणि हलकी तसेच मध्यम व अवजड व्यावसायिक वाहनांसाठी ७४५ रुपये (जीएसटी व फिटमेंट शुल्क अतिरिक्त) आकारले जाणार आहेत.
केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५० तसेच मोटार वाहन अधिनियमातील कलम १७७ नुसार पोलीस व परिवहन विभाग संयुक्त अथवा स्वतंत्रपणे तपासणी आणि कारवाई करणार आहेत.
