बेवारस मृतदेह प्रकरणात प्रशासनाचा दणका; ठेकेदारासह तिघांवर गुन्हा, स्वच्छता निरीक्षकावर कारवाईची तलवार

0

आबिद शेख/अमळनेर 


अमळनेर : बेवारस मृतदेहाची वाहतूक कचरा संकलनासाठी वापरल्या जाणाऱ्या घंटागाडीतून करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणात अखेर पोलीस आणि नगरपरिषद प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. या घटनेनंतर संबंधित ठेकेदार, सुपरवायझर आणि घंटागाडी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, बेवारस मृतदेहांच्या विल्हेवाटीची जबाबदारी असलेल्या स्वच्छता निरीक्षकाविरुद्ध विभागीय शिस्तभंग कारवाईचा प्रस्तावही पुढे पाठविण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे अमळनेरमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती. बेवारस मृतदेहाला सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना त्यासाठी स्वतंत्र वाहनाऐवजी कचरा वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनाचा वापर झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.


या संदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात एफआयआर क्र. 0331/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 मधील कलम 223 व 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपरिषदेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित ठेकेदार रामदास बाळू पवार, त्यांचे सुपरवायझर राजेंद्र गोलाईत आणि संबंधित घंटागाडी चालक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेवारस मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी स्वतंत्र वाहन वापरण्याबाबत प्रशासनाकडून स्पष्ट लेखी सूचना देण्यात आलेल्या होत्या. मात्र, त्या आदेशाचे पालन न करता 26 जून रोजी ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन कक्षातून संबंधित मृतदेहाची वाहतूक MH-19-CX-0634 या कचरा संकलनासाठी वापरल्या जाणाऱ्या घंटागाडीतून करण्यात आली. यासाठी नगरपरिषदेची कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आली नसल्याचा आरोपही नोंदविण्यात आला आहे.
घटना समोर आल्यानंतर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी तत्काळ संबंधितांविरुद्ध तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून पुढील तपास पोलीस हवालदार विनोद लक्ष्मण सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची अंतर्गत चौकशीदेखील पूर्ण केली आहे. चौकशीत समोर आलेल्या बाबींनुसार, 3 फेब्रुवारी 2026 रोजीच्या आदेशानुसार बेवारस मृतदेहांच्या विल्हेवाटीची जबाबदारी स्वच्छता निरीक्षक संतोष माणिक यांच्याकडे सोपविण्यात आली होती. मात्र, संबंधित जबाबदारी पार पाडण्यात निष्काळजीपणा झाल्याचा ठपका ठेवण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed