अमळनेर शहरात लवकरच ४ ते ५ दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन; नागरी समस्यांवर शविआ बैठकीत प्रशासनाला धारेवर.

0

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर : यंदाच्या उन्हाळ्यात तांत्रिक अडचणींमुळे विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र आता तापी नदीत पाणीसाठा उपलब्ध झाल्याने अमळनेर शहरात लवकरच ४ ते ५ दिवसाआड नियमित व स्वच्छ पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिली.


नगरपालिका सभागृहात शहर विकास आघाडीच्या (शविआ) बैठकीत गटनेत्या सौ. जयश्री पाटील यांच्या उपस्थितीत विविध नागरी प्रश्नांवर चर्चा झाली. बैठकीत नगरसेवकांनी पाणीपुरवठा, स्वच्छता, गटारी, कचरा व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
बैठकीत नगरसेवक डॉ. डिगंबर महाले यांनी ही बैठक राजकीय आरोप-प्रत्यारोपांसाठी नसून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी असल्याचे स्पष्ट केले. अनेक प्रश्नांवर संबंधित अधिकारी समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत, असा आरोप उपस्थितांकडून करण्यात आला.
यंदाच्या उन्हाळ्यात नागरिकांना तब्बल ८ ते १२ दिवसाआड पाणी मिळाल्याने शहर विकास आघाडीने मोर्चाचा इशारा दिला होता. मात्र मुख्याधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर तो स्थगित करण्यात आला. त्यानंतरच ३० जून रोजी विशेष बैठक घेण्यात आली.
बैठकीत विस्कळीत व अशुद्ध पाणीपुरवठा, पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता, पावसाळ्यात गटारी तुंबून होणारे जलसंचय, भुयारी गटार व्यवस्था, पाण्याची गुणवत्ता (टीडीएस), तसेच कचरा घंटागाडीतून मृतदेह वाहतूक प्रकरण यांसह विविध मुद्दे आक्रमकपणे मांडण्यात आले.
विशेष म्हणजे सभागृहात प्रत्यक्ष पाणी नमुना तपासण्यात आला असता त्याचा टीडीएस सुमारे ४०० असल्याचे निदर्शनास आले. यावर नागरिकांना दिले जाणारे पाणी सुरक्षित व पिण्यायोग्य आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात आला. नागरिकांना स्वच्छ, निर्जंतुक आणि दर्जेदार पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
घनकचरा व्यवस्थापनातील निष्काळजीपणाबाबत संबंधित ठेकेदारास ब्लॅकलिस्ट करून गुन्हे दाखल करण्याची तसेच पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता न करणाऱ्या जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणीही बैठकीत करण्यात आली.
बैठकीच्या शेवटी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी सर्व प्रश्न गांभीर्याने घेत लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्यासह अन्य नागरी समस्यांवरही आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
बैठकीस नगरपालिका प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी तसेच शहर विकास आघाडीचे पदाधिकारी, नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सभागृहातील बंद पडलेले घड्याळही निदर्शनास आणून देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed