अमळनेरमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा; शहरात जलभराव, जनजीवन विस्कळीत.

0

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : अमळनेर शहरासह संपूर्ण तालुक्यात सोमवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. सुमारे तीन तास सलग कोसळलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले असून ग्रामीण भागात शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


दुपारनंतर अचानक सुरू झालेल्या जोरदार पावसाने शहरातील सखल भागांना मोठा फटका बसला. इस्लामपुरा, शिव कॉलनी, बी.एन. किराणा परिसर, कन्या शाळा परिसर, मुख्य बाजारपेठ, नगर परिषद कार्यालयासमोरील रस्ता तसेच इतर अनेक प्रमुख मार्गांवर गुडघाभर पाणी साचल्याने अनेक ठिकाणी तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली.
नाल्यांची योग्य प्रकारे पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी पडल्याने आणि काही ठिकाणी गटारे तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर आले. त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
अनेक दुकानांमध्येही पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सततच्या पावसामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला असून काही भागांत वाहतूक संथ गतीने सुरू होती.
दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यास प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed