क्रांतिवीर नवलभाऊ पाटील आणि रुक्मिणीताई यांच्या जीवनचरित्राचे प्रकाशन उत्साहात संपन्न
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती एस.एन.डी.टी. महिला महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित एक दिवसीय कार्यशाळेमध्ये शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध मान्यवरांचा मानपत्र व ट्रॉफी देऊन विशेष सन्मान करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळाही संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशासकीय अधिकारी आबासाहेब डी. बी. पाटील हे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जे. शेख यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.

राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक, शैक्षणिक व लोककल्याणकारी कार्याचा सविस्तर आढावा प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून मांडला. तसेच उपस्थितांना प्रा. डॉ. राहुल निकम यांनी मार्गदर्शन करत शाहू महाराजांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमात थोर स्वातंत्र्य सेनानी क्रांतिवीर नवलभाऊ पाटील व खानदेश गौरव रुक्मिणीताई यांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकाचे मुख्य संपादक प्राचार्य डॉ. एस. जे. शेख असून सावित्रीबाई फुले विद्यालयाचे शिक्षक अनिल पाटील हे उपसंपादक आहेत. तसेच प्रा. डॉ. शुभांगी चव्हाण आणि प्राचार्य डॉ. आशिया अहमद रेडिओ वाला यांनीही उपसंपादक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य कैलास चव्हाण, उमेश काटे, अशोक बिऱ्हाडे आणि प्रमोद पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनील वाघमारे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद तसेच प्राध्यापकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
