वटसावित्री पौर्णिमेनिमित्त ३० वटवृक्षांची लागवड; चिमणपुरी पिंपळे खुर्दच्या महिला शेतकरी गटांचा प्रेरणादायी उपक्रम.
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – वटसावित्री पौर्णिमेचे औचित्य साधत चिमणपुरी पिंपळे खुर्द येथील महिला शेतकरी गटांनी पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देत तब्बल ३० वटवृक्षांची लागवड केली. विशेष म्हणजे, केवळ वृक्षलागवड न करता या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारीही महिलांनी स्वीकारली आहे.
लागवडीपूर्वी महिलांनी वटवृक्षाची विधिवत पूजा करून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. “वृक्षलागवड हीच भविष्यातील समृद्धीची गुरुकिल्ली आहे. पाऊस, पर्यावरण आणि जीवनमान यांचा थेट संबंध वृक्षांशी आहे. वृक्षांशिवाय पाऊस नाही आणि पावसाशिवाय समृद्ध जीवन नाही,” अशी भावना यावेळी महिलांनी व्यक्त केली.

या उपक्रमात धरती माता महिला शेतकरी गट, संघर्ष महिला शेतकरी गट आणि भूमाता महिला शेतकरी गट यांच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारली.
या प्रेरणादायी उपक्रमाची प्रेरणा तालुक्याचे भूमिपुत्र तथा आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे यांच्याकडून मिळाल्याचे महिलांनी सांगितले.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मा. सरपंच दिनेश पाटील, रवींद्र पाटील, महेंद्र पाटील, सुभाष पाटील, अरविंद पाटील, भैया पाटील, अनिल पाटील, भाऊसाहेब पाटील आणि संजय पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.
वटसावित्रीसारख्या पारंपरिक सणाला पर्यावरण संवर्धनाची जोड देत महिला शेतकरी गटांनी दिलेला हा संदेश समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, “एक सण… एक वृक्ष… एक संकल्प” ही संकल्पना प्रत्यक्षात साकारल्याबद्दल या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
