अमळनेरमध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी ८७ टक्के उद्दिष्ट पूर्ण.
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : अमळनेर शहरात राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून पहिल्याच दिवशी आरोग्य विभागाने उल्लेखनीय कामगिरी करत ८७.०७ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.
शहरात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या पोलिओ बुथ, रेल्वे स्थानक व बस स्थानकावरील विशेष पथके तसेच मोबाईल पथकांच्या माध्यमातून दिवसभर मोठ्या प्रमाणात बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्यात आला.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, शहरातील एकूण १२ हजार ९६२ बालकांना पोलिओचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी १० हजार ८८९ बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजण्यात आले असून पहिल्याच दिवशी मोहिमेने समाधानकारक यश मिळवले आहे.
या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी रोटरी क्लब, लायन्स क्लब तसेच विविध शैक्षणिक संस्थांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षीत बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, मुख्याधिकारी गणेश शिंदे, सर्व सभापती, नगरसेवक व नगरसेविका यांनीही विशेष सहकार्य केले.
मोहिमेच्या उद्घाटनावेळी आरोग्य सभापती श्री. रामकृष्ण पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरिष गोसावी, वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन, डॉ. राजेंद्र शेलकर तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, दि. २९ जून ते ३ जुलै २०२६ या कालावधीत ३० विशेष पथके शहरातील प्रत्येक घरात जाऊन पाच वर्षांखालील बालकांना पोलिओचा डोस देणार आहेत. घरभेट मोहिमेद्वारे आज डोस घेण्यापासून वंचित राहिलेल्या प्रत्येक पात्र बालकापर्यंत पोहोचून शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचा आरोग्य विभागाचा निर्धार आहे.
आरोग्य विभागाने पालकांना आवाहन केले आहे की, घरभेटीदरम्यान येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करून आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत.
