अनु. जाती उपवर्गीकरणाला विरोध; मुंबईतील विराट मोर्चासाठी अमळनेरमध्ये चर्मकार समाजाची बैठक.
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : शासनाने अनुसूचित जाती (अनु. जाती) उपवर्गीकरणाचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर त्यास विरोध दर्शविण्यासाठी ३० जून रोजी मुंबई येथे होणाऱ्या विराट मोर्चाच्या नियोजनासाठी अमळनेर शहर व ग्रामीण चर्मकार समाज बांधवांची पूर्वनियोजित बैठक शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे पार पडली.

ही बैठक राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत शासनाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. उपवर्गीकरण करताना समाज बांधवांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतला जात असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच उपवर्गीकरणाची मागणी नसताना हा निर्णय का आणि कोणासाठी घेतला जात आहे, असा सवालही उपस्थित करण्यात आला.
या निर्णयामुळे अनुसूचित जाती वर्गावर अन्याय होण्याची शक्यता व्यक्त करत राज्यभरातून विरोधाची भूमिका घेतली जात असून, त्याचाच एक भाग म्हणून ३० जून रोजी मुंबई येथे मोठा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
राष्ट्रीय चर्मकार महासंघ देखील या मोर्चात सहभागी होणार असून, मोर्चाच्या नियोजनासाठी अमळनेर शहर व ग्रामीण भागातील समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते पांडुरंग विसावे, नगरसेविका अंजली विसावे तसेच अमळनेर शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी उपस्थित होते. होणाऱ्या मोर्चाला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भानुदास विसावे व पांडुरंग विसावे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बिऱ्हाडे यांनी केले. बैठकीस समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
