दोन थेंब जीवनाचे’ मोहिमेला अमळनेरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अमळनेर शहरात पोलिओ लसीकरणाला वेग; दुपारी १२ वाजेपर्यंत ५६६१ बालकांना डोस.
आबिद शेख /अमळनेर 
अमळनेर : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत आज अमळनेर शहरात मोठ्या उत्साहात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. शहरातील नागरिकांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली.
या मोहिमेसाठी संपूर्ण शहरात एकूण ७८ पोलिओ बुथ उभारण्यात आले असून, नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानक व बस स्थानक परिसरात स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहेत. शहरातील एकही पात्र बालक पोलिओ डोसपासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.

याशिवाय शहरालगतच्या तसेच दुर्गम भागांमध्ये पोहोचण्यासाठी दोन मोबाईल पथके कार्यरत असून, घराघरात जाऊन बालकांना पोलिओचे डोस देण्याचे काम सुरू आहे. संपूर्ण मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी शहरातील विविध केंद्रांवर एकूण २३४ कर्मचारी कार्यरत असून देखरेख, समन्वय व नियोजनासाठी १६ सुपरवायझर नियुक्त करण्यात आले आहेत.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील या मोहिमेसाठी अपेक्षित लाभार्थी बालकांची संख्या १२ हजार ९६२ इतकी आहे. त्यापैकी दुपारी १२ वाजेपर्यंत ५ हजार ६६१ बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्यात आला असून, हे एकूण उद्दिष्टाच्या ४३ टक्के इतके काम पूर्ण झाल्याचे दर्शवते.
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम यशस्वी करण्यासाठी शहरातील रोटरी क्लब, लायन्स क्लब तसेच विविध शैक्षणिक संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवत प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले.
या मोहिमेसाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षीत बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, मुख्याधिकारी गणेश शिंदे, सर्व सभापती, नगरसेवक व नगरसेविका यांचेही विशेष सहकार्य लाभले.
मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी आरोग्य सभापती श्री. रामकृष्ण पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरिष गोसावी, वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शेलकर तसेच आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
आरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, पाच वर्षांखालील एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी आणि उर्वरित वेळेत जवळच्या पोलिओ केंद्रावर जाऊन बालकांना पोलिओचे दोन थेंब अवश्य द्यावेत.
